परेश रावल पूर्ण करणार ऋषी कपूरचा सिनेमा

प्रख्यात अभिनेता ऋषि कपूर (Rishi Kapoor) यांचे गेल्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कॅन्सरने गाठल्यानंतर ऋषी कपूर यांनी त्यावर परदेशात जाऊन उपचार घेतले होेते. उपचारानंतर ते परत भारतात आले आणि त्यांनी सिनेमात काम करण्यासही सुरुवात केली होती. दीपिकासोबत त्यांनी हॉलिवुडच्या सुपरहिट ‘द इंटर्न’ च्या हिंदी रिमेकमध्ये काम करण्यास होकार दिला होता. तसेच ‘शर्मा जी नमकीन’ या सिनेमाच्या शूटिंगलाही त्यांनी सुरुवात केली होती. या सिनेमातील काही दिवसांचेच काम बाकी असताना त्यांचे निधन झाल्याने शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. मात्र आता परेश रावल (Paresh Rawal) यांनी ऋषी कपूरचे काम पूर्ण करण्याचा विडा उचलला असून ऋषी कपूर यांच्या पहिल्या जयंतीदिनी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी रिलीज करून ऋषी कपूर यांना आदरांजली वाहाण्याचे ठरवले आहे.

चित्रपटाची निर्मिती हनी त्रेहान करीत असून दिग्दर्शन हितेश भाटिया करीत आहे. चित्रपटाचे सहनिर्माते आहेत रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या सिनेमाला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर पुढील शेड्यूल मार्चमध्ये होते पण कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाला आणि शूटिंग बंद झाले. त्यानंतर एप्रिल महिन्यात ऋषी कपूर यांचे निधन झाले. ऋषि कपूर यांचे फक्त चार-पाच दिवसांचेच काम बाकी होते. आता शूटिंग पुन्हा सुरु झाले असले तरी ऋषी कपूर यांची भूमिका पूर्णपणे कापून नव्याने सिनेमा तयार करणे निर्मात्यांना फारच खर्चिक ठरणार आहे. त्यामुळे निर्मात्यांनी वीएफएक्सची मदत घेण्याचे ठरवले आहे. या सिनेमात परेश रावल आणि ऋषी कपूर यांची जोडी धमाल करताना दिसणार होती.

परेश रावल यांनी ऋषी कपूर यांचे उरलेले सीन स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे. परेश रावल यांनी सांगितले, ऋषी कपूर माझा चांगला मित्र होता. या सिनेमात आम्ही धमाल केली आहे. त्याच्या पहिल्या जयंतीदिनी आम्ही त्याला एका अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहाण्याचे ठरवले आहे. मी ऋषी कपूर यांची भूमिका पडद्यावर साकारणार आहे. यासाठी व्हीएफएक्सचा वापर केला जाणार आहे. निर्माते हनी त्रेहान यांनीही व्हीएफएक्सच्या माध्यमातून ऋषी कपूर यांना पडद्यावर जीवंत करणार असल्याचे सांगितले.

ऋषी कपूर 2019 मध्ये ‘द बॉडी’ सिनेमात शेवटचे दिसले होते. इमरान हाशमी अभिनीत या सिनेमात त्यांनी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER