रिषभ पंतची दिलदारी : उत्तराखंडमधील मदतकार्याला मोठी देणगी

Uttarakhand Glacier Burst - Rishabh Pant

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) हिमकडा कोसळल्याने नद्यांना आलेल्या महापुराच्या (Flash flood) दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या मदतकार्यासाठी भारताचा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने मोठी देणगी जाहीर केली आहे. आपले कसोटी सामन्याचे पूर्णच्या पूर्ण शुल्क (Match Fee) तो या मदतनिधीला देणार आहे. या मदतकार्याला इतरांनीही मदतीसाठी पुढे यावे असे आवाहनही त्याने केले आहे.

उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात जोशीमठ येथे हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला आणि त्यामुळे हिमालयातील वरच्या भागात फार मोठे नुकसान झाले. रिषभ पंत हा उत्तराखंडचाच खेळाडू असून हरिद्वार जिल्ह्यातील रुडकी हे त्याचे गाव आहे.

या दुर्दैवी घटनेबद्दल ट्विट करताना त्याने म्हटलेय की, उत्तराखंडातील हानीबद्दल, विशेषतः जीवित हानीचे मला मोठे दुःख आहे. तेथे सुरू असलेल्या मदतकार्यासाठी मी माझी मॅच फी देत आहे आणि इतरांनीसुद्धा मदतीसाठी पुढे यावे, असे मी आवाहन करतो.

त्याआधीसुद्धा रविवारी त्याने या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले होते. त्यावेळच्या आपल्या संदेशात त्याने म्हटले होते की, उत्तराखंडमधील महापुरात आपल्या कुटंबीयांना गमावलेल्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कुटुंबांसाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो. या ठिकाणी सुरू असलेल्या मदतकार्याची संकटात सापडलेल्यांना मदत होईल, अशी मी आशा करतो.

त्याआधी इंग्लंडविरुद्धच्या चेन्नई कसोटीत त्याने ९१ धावांची उपयुक्त खेळी केली आहे. सध्या रिषभ पंत हा बीसीसीआयच्या वार्षिक कराराच्या अ श्रेणीतील खेळाडू असून या श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक पाच कोटी रुपये मिळत असतात; पण अलीकडच्या चांगल्या कामगिरीने त्याची ए प्लस श्रेणीत बढती होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास रिषभला मंडळाकडून वार्षिक सात कोटी रुपये मिळतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER