फलंदाजी असो वा यष्टीरक्षण…रिषभ पंत का जवाब नही!

Rishabh Pant

यष्टीरक्षक (Wicketkeeper) हे आकर्षक फलंदाज असतात हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. रिषभ पंतच्या (Rishabh Pant) धडाकेबाज शतकाने याची आणि महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) , अॕडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) , ए.बी.डीविलीयर्स, जोस बटलर, क्विंटन डी कॉक यांची आठवण करुन दिली आहे. ज्या पध्दतीने त्याने जेम्स अँडरसनसारख्या कसलेल्या गोलंदाजाला नव्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा चौकार लगावलाय, अख्ख्या क्रिकेट जगतात रिषभ पंतची चर्चा आहे कारण जलद गोलंदाजाला नव्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा (Reverse sweep) चौकार लगावणे ही सोपी गोष्ट नाही. 2014 पासून कुणीच अँडरसनला असा फटका लगावलेला नव्हता. या मागच्या सहा-साडेसहा वर्षात बरेच भारीभारी फलंदाज अँडरसनला (James Anderson) खेळले असतील पण ते जे हिंमत करु शकले नाहीत ती रिषभने दाखवली आणि चक्क रिव्हर्स स्वीपचा चौकार अँडरसनला लगावला.

चर्चेचा विषय झालेल्या या फटक्याबद्दल त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की काहीसा पूर्वनियोजीतच हा फटका होता. जेंव्हा तुम्ही फाॕर्मात असता तेंव्हा सगळ्या गोष्टी घडून येतात.

अशीच आणखी एक आश्चर्यजनक गोष्ट रिषभने केली की त्याने षटकाराने शतक साजरे केले आणि शतकातील दुसरे अर्धशतक फक्त 33 चेंडूत पूर्ण केले. ज्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे अवघड आहे अशी सूर काहींनी लावलाय त्यांची तर तोंडेच त्याने आपल्या या खेळीने शिवलीय.

रिषभ एवढी बिनधास्त फलंदाजी कशी करतौ याचे उत्तर रोहित शर्माने काही चॕनल्सना दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये आहे. रोहितने म्हटलेय की रिषभ आमच्यासाठी त्याचे काम चोख करतोय. एम.एस.धोनी यांची जागा तो भरून काढतोय. आम्ही त्याला सांगितलेय की तू फारसा विचार करायचा नाहीच. आम्ही करणार. खेळाबद्दल चिंता करणारे, काळजी करणारे संघात इतर आहेत. तुला फक्त तुझा नैसर्गिक खेळ करायचा आहे. तुझ्याकडून आम्हाला तेवढेच अपेक्षित आहे आणि तू ते करतोय ही चांगली गोष्ट आहे.

रोहितसारख्या सिनियर खेळाडूने हे सांगणे म्हणजे संघाने त्याला किती मोकळे, दबावरहित ठेवलेय तेच सांगतेय कदाचित त्यामुळेच गेल्या तीन महिन्यात मिचेल स्टार्क, पॕट कमिन्स, जोश हेझलवूड, जेम्स अँडरसन, बेन स्टोक्स, नेथन लियान हे जे सद्यस्थितीत आघाडीचे गोलंदाज आहेत त्यांना तो भारी पडलाय.

गेल्या सहा कसोटीत चार अर्धशतके आणि एक शतक त्याने केले आहे. सिडनीतल्या 97 धावा, ब्रिस्बेन कसोटीतील नाबाद 89 धावा, चेन्नई कसोटीतील 91 व नाबाद 58 धावा आणि आता अहमदाबादच्या 101 धावा ही त्याची प्रत्येक खेळी संघाला संकटातून बाहेर काढणारी ठरली आहे.यामुळे अलीकडच्या काळात तो भारतीय संघाचा तारणहार ठरलाय असे म्हणणे चुकीचे ठरु नये.

यामुळेच 18 आॕगस्ट 2018 रोजी त्याने इंग्लंडविरुध्द पदार्पण साजरे केले तेंव्हापासून यष्टीरक्षकांमध्ये सर्वाधिक कसोटी धावा त्याच्या नावावर आहे.

रिषभ पंतच्या पदार्पणापासून यष्टीरक्षकांच्या धावा (सामने- धावा- शतकं- स्ट्राईकरेट या क्रमाने)

रिषभ पंत ———- 20 — 1358 — 3 — 71.47
क्विंटन डीकाॕक — 15 — 1074 — 2 — 71.98
निरोशन डिकवाला- 19 — 0958 — 0 — 61.68
बी.जे. वाटलिंग —- 19 — 0936 — 2 — 39.72
जोस बटलर ——– 15 — 0849 — 1 — 55.59

म्हणजे पदार्पणापासून रिषभ पंतपेक्षा अधिक धावा दुसऱ्या कुठल्याही यष्टीरक्षकाने केलेल्या नाहीत. त्याच्याएवढी शतकंसुध्दा इतर कुणा नाहीत आणि 800 च्या वर धावा करताना त्याच्याएवढी सरासरीसुध्दा (42.56) इतर कुणाची नाही. स्ट्राईक रेटच्या बाबतीतही केवळ क्विंटन डीकाॕक हाच त्याच्या थोडासाच पुढेआहे.

आणि केवळ फलंदाजम्हणूनच नाही तर त्याचे मूळ जे काम आहे यष्टीरक्षकाचे…त्यातही तो आघाडीवर आहे. 20 सामन्यात 73 झेल आणि 6 यष्टीचीत त्याच्या नावावर आहेत. यात 6 सामन्यात त्याने 5 किंवा अधिक झेल घेतले आहेत आणि यात अॕडिलेड कसोटीतील तब्बल 11 झेलांचा विक्रमसुध्दा आहे. यासह त्याने जॕक रसेल व एबीडी विलीयर्सच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली होती.म्हणून यष्टीरक्षण असो वा फलंदाजी…रिषभ पंत का जवाब नही अशी स्थिती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER