रिसॅट-२बी उपग्रहाचे प्रक्षेपण यशस्वी; पृथ्वीवर ठेवणार नजर

risat

श्रीहरिकोटा :- इस्रोने आज पहाटे ५ वाजता पीएसएलव्ही-सी ४६ सोबत रिसॅट-२बी हा अत्यंत महत्त्वाचा उपग्रह अंतराळात सोडला. पृथ्वीवर नजर ठेवणाऱ्या या उपग्रहाद्वारे भारत-पाकिस्तान सीमेवरही नजर ठेवता येईल. यामुळे सीमेपलीकडून भारतात होणारी घुसखोरी रोखता येईल. याशिवाय शेती, वन याबाबतची माहिती घेणे आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ४६चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. त्यानंतर पीएसएलव्ही-सी४६ ने पृथ्वीची निगराणी करणारा रिसॅट -२बी हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीपणे सोडला. यामुळे हवामानाचा अंदाज घेता येणार आहे. नैसर्गिक संकटाचा सामना करणं सोपं होणार आहे. रिसॅट-२बी सोबतच सिंथेटिक अपर्चर रडारही अंतराळात लॉन्च करण्यात आलं आहे. त्याचा दूरसंचार क्षेत्राला फायदा होणार आहे.

उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यापूर्वी इस्रोचे चेअरमन के. सीवन यांनी तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात जाऊन पूजा केली होती. उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यापूर्वी तिरुपतीच्या वेंकटेश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्याची इस्रोची परंपरा आहे. हा उपग्रह अंतराळातून जमिनीवरील तीन फूट आकाराच्या वस्तूचे फोटो घेऊ शकतो. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर या मालिकेतील उपग्रह विकसित करण्यात आले होते. या उपग्रहाचं वजन ६१५ किलोग्रॅम आहे. प्रक्षेपणानंतर हा उपग्रह १५ मिनिटांनी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आला.