रिंकू झळकणार अमेझॉन प्राईमवर

Rinku Rajguru

ऑनलाईन शॉपिंग जरी प्रत्यक्ष केले नसले तरी ऑनलाईन विंडो शॉपिंग करणारा प्रत्येक जण आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग इंटरनेटवरच्या वेगवेगळ्या शॉपिंग साइट या सगळ्या शब्दांच्या यादीमध्ये अमेझॉन हे नाव आता प्रत्येकाच्या परिचयाचे आहे. अमेझॉन प्राईमवर वेगवेगळे सिनेमे रिलीज होत असतात आणि हे सिनेमे पाहणारा प्रेक्षक यांची संख्यादेखील खूप मोठी आहे. या यादीमध्ये ‘सैराट’फेम रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) ही झळकणार आहे. ‘अनपॉझ’ असं या सिनेमाचं नाव असून पाच वेगवेगळ्या कथांचा कोलाज म्हणजे हा सिनेमा आहे. १८ डिसेंबरला हा सिनेमा ऑनलाईन रिलीज होणार आहे आणि यासाठी तिचे चाहते १८ डिसेंबर या तारखेकडे डोळे लावून बसले आहेत.

सातवीत असताना एका सिनेमाचं चित्रीकरण बघायला गेलेली सोलापुरातल्या करमाळ्याची रिंकू. तिचा अंदाज पाहून दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला त्यांच्या नव्या सिनेमाची नायिका बनवलं. रिंकू राजगुरू हे नाव जगाच्या सिनेमा इंडस्ट्रीत पोहचलं. खरं तर दहावीत चांगले मार्क मिळवून डॉक्टर होण्याची इच्छा असलेल्या रिंकू राजगुरूचे नाव अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणून राष्ट्रीय पुरस्कारावर कोरलं गेलं ते ‘सैराट’ या सिनेमातून. अत्यंत साधी सामान्य कुटुंबातील मुलगी सैराट सिनेमानंतर अभिनेत्री झाली. ‘सैराट’च्या यशाने तिचे याच क्षेत्रातील करिअर निश्चित झाले आणि डॉक्टर होण्याचा विचार मागे पडला.

‘सैराट’नंतर काही दिवसांची विश्रांती घेत रिंकू राजगुरू पुन्हा पडद्यावर दिसली ती ‘कागर’ आणि ‘मेकअप’ या दोन सिनेमांच्या माध्यमातून. या दोन सिनेमांची कथादेखील वेगळी होती आणि त्यातही रिंकूच्या अभिनयाला दाद मिळाली. ‘सैराट’चा हिंदी रिमेकदेखील ‘धडक’ नावाने पडद्यावर आला; मात्र सैराट आर्चीची जादू हिंदी सिनेमाच्या वलयातदेखील तिचे चाहते विसरू शकले नाहीत हेच रिंकूच्या अभिनयाचे यश. मराठी सिनेमा, जाहिराती अशी घोडदौड करत असतानाच रिंकूने लारा दत्ता या हिंदी अभिनेत्रीसोबत ‘हंड्रेड’ ही वेब सिरीज केली.

या वेब सिरीजमधल्या तिच्या अभिनयालादेखील खूप चांगली प्रतिक्रिया मिळाली. सतत काही तरी वेगळं करण्याची रिंकूची धडपड तिच्या यशाचं प्रमुख कारण ठरलं . तिच्या फॅन क्लबमध्येदेखील दिवसेंदिवस वाढ होत गेली. ‘सैराट’मधील आर्ची आणि सध्याची रिंकू राजगुरू यांच्यामध्ये कमालीचा बदल झाला आहे. लूक असेल, आत्मविश्वास असेल यामध्येदेखील रिंकू राजगुरू मी स्वतःमध्ये खूप प्रगती केली आहे. तिने ‘छूमंतर’ या सिनेमासाठी लंडनमध्ये चित्रीकरणालादेखील हजेरी लावली होती. लवकरच हा सिनेमा पडद्यावर येणार आहे. सध्या तिच्या ‘अनपॉझ’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. यापूर्वीदेखील सिनेमा सादरीकरणामध्ये जे वेगवेगळे प्रयोग झाले आहेत त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या कथांचा एकत्रित कोलाज असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवणारा ठरला आहे.

‘अनपॉझ’ हा नवा सिनेमा रिंकू राजगुरू करत आहे. यामध्ये ग्लिच, रट ए टट , अपार्टमेंट, विषाणू आणि चांद मुबारक मुबारक, अशा पाच वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे रिंकू राजगुरू या पाच कथांमध्ये वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहेच; पण वेगळ्या धाटणीच्या भूमिकादेखील करणार आहे. तिचा हा वेगळा अंदाज पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत; पण स्वतः रिंकू राजगुरू हीदेखील अशा प्रकारचा प्रयोग करण्यासाठी उत्सुक आहे. तिने लॉकडाऊन काळात वेगवेगळे व्हिडीओ पोस्ट केले होते, ज्यामध्ये ती काही रेसिपीज आईकडून शिकत होती. त्यादेखील तिने तिच्या सोशल मीडिया पेजवर पोस्ट केल्या होत्या. रिंकू आता बारावीमध्ये आहे आणि अभ्यास सांभाळून ती अभिनयाची आवडदेखील चांगल्या पद्धतीने जपत आहे .

भविष्यात रिंकू अजून कुठल्या कुठल्या वेगळ्या रूपात आणि वेगळ्या भूमिकांमध्ये पाहायला मिळते त्याची प्रतीक्षा असलेल्या तिच्या चाहत्यांसाठी तिचा अमेझॉनवर रिलीज होणारा सिनेमा नक्कीच कौतुकाचा विषय ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER