ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी रिंगरुट

800 रिक्षा; 6 बसेस करणार तैनात

Ring Route for Divyanga voters

ठाणे, प्रतिनिधी: ठाणे जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून रिंगरुट तयार करण्यात येणार असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी यांनी दिली. तसेच दिव्यांगाना मतदान केंद्रापर्यत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात 800 रिक्षा तर, 6 बसेस तैनात करण्यात येणो असल्याचे देखिल त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांना अधिकाधिक सुलभता व्हावी यासाठी अधिक लक्ष दिले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला यांच्यासाठीही वेगळ्या रांगा व अन्य सुविधा देण्यात येणार आहेत. मतदान केंद्रावर पाळणा घरेही तयार करण्यात येणार आहे. दिव्यांग मतदारांना त्यांच्या मागणी नुसार वाहनाची सुविधा पुरविण्यात येणार आहे. तसेच मतदान केंद्रावर व्हील चेअर, जे दिव्यांग स्वतःच्या वाहनांवर येतील त्यांच्या वाहनांची स्वतंत्र पार्कींग व्यवस्था व तेथून मतदान बुथ पर्यंत व्हील चेअर, सहाय्यक आदी सुविधा जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने दिल्या जाणार आहेत.

त्यानुसार ठाणे जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून रिंगरुट तयार करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांगाची ने – आण करण्यासाठी ठाणे महानगर पालिकेच्या 4 बसेस आणि 2 नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन विभागाच्या बसेस ठेवण्यात येणारा आहे. तसेच जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात दिव्यांगाना मतदान केंद्रावर ने – आण करण्यासाठी शहरी भागात अबोली तर, ग्रामीण भागात रिक्षा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी यांनी दिली.