अधिकारही एसेम जोशींसारखा हवा हो दादा…

S.M. Joshi

Shailendra Paranjapeअजितदादा जरा प्रेमानं घ्या, धाक दाखवून माणसं काम करत नाहीत. अधिकाऱ्यांच्या अडचणी जाणून घ्या आणि प्रेमाने काम करा. मुळात त्यासाठी वीकेण्डला पुण्यात येण्याऐवजी पुण्यात मुक्काम टाकूनच पालकमंत्री म्हणून काम करा.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी हा सल्ला पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलाय. त्याला कारणही तसंच आहे. पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्यानं आकांडतांडव केलं होतं आणि अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं होतं.

मुळात मार्च महिन्यापासून पुण्यामध्ये कोरोना (Corona) नियंत्रणाच्या दृष्टीने राजकीय नेतृत्वानं पहिले दोन महिने पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. दोन महिन्यांत अजित पवार यांना पुण्यात यायला वेळ नव्हता आणि बारामतीमध्ये राबवलेला जोधपूर पॅटर्न अचानक बारामती पॅटर्न करून पुण्यात राबवा, असा सल्ला त्यांनी दोन महिन्यांनी पुण्यात येऊन दिला होता. वास्तविक विकेंद्रित पद्धतीचं कोरोनाचा मुकाबला करायला हवा, हे अगदी पंतप्रधानांनीदेखील दुसऱ्या लॉकडाऊन उठवण्याच्या वेळेपासून स्पष्ट केलं होतं.

तरीही मुंबई आणि मंत्रालय सोडून पवार पुण्यात आले नव्हते. मार्च-एप्रिल या दोन महिन्यांत त्यांनी अपवादात्मक एखादी बैठक पुण्यात घेतली होती. अर्थात त्यावेळी पुण्याच्या महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने राज्य सरकारनं पुण्याला वाऱ्यावर सोडलं असल्याची टीका स्थानिक वृत्तपत्रातून झाली होती. मग अजित पवार यांनी मे महिन्यात बैठकासत्र सुरू केलं आणि एकापाठोपाठ एक असे आठ प्रशासकीय अधिकारी कोरोना मुकाबल्यासाठी पुण्यात नेमले.

त्याआधी पुण्यात जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्त ही चारही चाकं वेगवेगळ्या दिशेनं जात कोरोना नियंत्रणाचा प्रयत्न करत होती. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी दुकानं खुली करा म्हटलं की पोलीस आयुक्त पोलीस पाठवून ती बंद करताना दिसत होते. पुण्याला वाली नव्हताच आणि आता टू मेनी कुक्स स्पॉइल द फूड, अशी अवस्था झाली आहे.

केवळ आणि केवळ पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे अधिकार देऊन कोरोना मुकाबल्याची पावलं उचलली जायला हवीत. अर्थात, केंद्रीय मंत्री, राज्याचे सर्वेसर्वा, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असे एकापाठोपाठ एक येतात, बैठका घेतात, अधिकाऱ्यांचे कान उपटून जातात आणि त्यातून फक्त पुणेकरांना होणारा पोलिसांचा त्रास वाढतो, हा गेल्या तीन महिन्यांतला अनुभव आहे. त्यामुळे आली लहर केला कहर, असल्या कोणत्याही नियोजनशून्य बैठकांऐवजी मुळात बैठका कोणी घ्याव्यात हेही एकदा ठरवायला हवं. लोकशाहीच्या सर्व मर्यादा लक्षात घेतल्या तरी थोर, ज्येष्ठ, केंद्रीय राज्यस्तरीय नेत्यांनी यावं, बैठक घ्यावी, पार पिंपरीपासून सगळीकडच्या अधिकाऱ्यांनी यावं आणि पुन्हा पहिले पाढे पन्नास, हे म्हणजे करदात्यांच्या पैशांचा शुद्ध अपव्यय आहे.

त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांनी दिलेला सल्ला अगदीच काही अनाठायी नाही. म्हणूनच आता आम्हाला अधिकाऱ्यांकडून कामं कशी करून घ्यायची, हे चंद्रकांत पाटील शिकवणार का, असं म्हणत अजितदादा त्यांच्या स्टाइलने बाईट वगैरेही देतील; पण त्यातून मूळ प्रश्न सुटणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. मुळात असा सल्ला देण्याची वेळ का येते, हे लक्षात घ्यायला हवं. माणूस मरताना ग्लासभर पाणी पुरते, पण वेळ गेल्यावर घागरभर पाणी तोंडात ओतूनही प्राण जायचा तो जातोच; कारण राजकारणात टायमिंग महत्त्वाचं आहे तसंच ते समाजकारणातही आहे आणि दंगलीतल्या जमावाच्या सामोरं जात हातातले दगड प्रक्षुब्ध लोक खाली टाकतील, अशी एसेम जोशी यांच्यासारखी पुण्याई, चारित्र्य यांचीदेखील राजकारणात, समाजकारणात गरज आहे. कोरोनामुळे ती जाणीव झाली तरी पुरे. बाकी धाक दाखवणे, प्रेम करणे आपापल्या वकुबाप्रमाणे सर्वांनीच करत राहावं; पण पुणेकरांना वाचवावं, इतकीच विनंती.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER