रिकी पोंटींग म्हणतो, आमचा तो निर्णय चूकलाच!

Ricky Ponting - Maharastra Today
Ricky Ponting - Maharastra Today

दिल्ली कॕपिटल्सने (DC) राजस्थान राॕयल्सविरुध्दचा (RR). सामना मजबूत स्थितीतून गमावल्यावर एक विषय चर्चेत आहे. तो म्हणजे दिल्लीचा कर्णधार रिषभ पंतने (Rishabh Pant). आपल्या गोलंदाजांचा व्यवस्थित उपयोग करुन घेतला का? कारण दहा षटकांअखेर राजस्थान राॕयल्सची स्थिती 5 बाद 52 अशी होती आणि आवश्यक धावगती 10 च्यावर पोहोचली होती. परंतू त्यानंतर डेव्हिड मिलरच्या फटकेबाजीने चित्र बदलले. डावातील 13 वे षटक मार्कस् स्टोईनीसने (Marcus Stoinis).टाकले त्यात 15 धावा निघाल्या आणि 14 व्या षटकात टॉम करनने 12 धावा दिल्या. याप्रकारे त्या दोन षटकांतच 27 धावा निघाल्या आणि सामन्यावरची दिल्लीची पकड सूटली. स्टोईनीसने ते एकच षटक टाकले पण तीन षटकात फक्त 14 धावा दिलेल्या रविचंद्रन अश्विनचे (Ravichandran Ashwin).एक षटक शिल्लक असताना, पंतने त्याला बाजूला करुन स्टोईनीसला गोलंदाजी का दिली हा प्रश्न अनेकांना पडलाय. अश्विनचे एक षटक शिल्लक असताना आणि तो प्रभावी ठरत असतानाही केलेला हा बदल दिल्लीच्या अंगलट आल्याची चर्चा आहे.

आता सामन्यानंतर दिल्ली कॕपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पोंटींग (Ricky Ponting) यांनीसुध्दा हा निर्णय चुकल्याचे मान्य केले. ते म्हणाले की अश्विनचा पूर्ण चार षटके उपयोग करुन न घेण्याचा आमचा निर्णय चुकलाच. शिवाय आमच्या गोलंदाजांनी ख्रिस मॉरिसला आखूड चेंडू जरा जास्तच टाकले ज्याचा त्याने पूरेपूर फायदा उचलला असे पोंटींग म्हणाले.

अश्विनने सातव्या षटकापासून सलग तीन षटके टाकताना फक्त 14 धावा दिल्या होत्या आणि त्याच्या गोलंदाजीवर राॕयल्सचे फलंदाज एकदासुध्दा चेंडू सीमापार करू शकले नव्हते. त्यानंतर तेवटीया व मिलर हे दोन डावखुरे फलंदाज खेळपट्टीवर होते. अश्विनविरुध्द त्यांना खेळणे अवघड जाते हे यापूर्वी दिसून आलेले होते. दवाचा परिणाम अजून दिसायचा होता आणि जर दवामुळे चेंडू ओलसर झाला असता तर किंवा उजव्या हाताचे फलंदाज असते तर अश्विन तेवढा प्रभावी कदाचित ठरला नसता..अशा स्थितीतही पंतने अश्विनला थांबवून स्टोईनीसाला गोलंदाजी दिली आणि स्टोईनीसच्या त्या षटकात 15 धावा निघाल्या आणि दिल्लीने फक्त दोन चेंडू शिल्लक असताना सामना गमावला.

हा निर्णय चुकलाच हे मान्य करताना पोंटींग यांनी म्हटले आहे की, संघाची बैठक होईल तेंव्हा आम्ही यावर चर्चा करू. ख्रिस मॉरिसला शेवटच्या क्षणांमध्ये फटकेबाजीची संधी देणारे चेंडू टाकले गेले त्याबद्दल पोंटिंग म्हणाला की, चेंडूचा टप्पा योग्य नव्हताच शिवाय दवामुळे चेंडूवर पकड राखणेही गोलंदाजांना अवघड जात होते. त्यामुळे काही चेंडू हातातून निसटून फूलटॉस दिले गेले. 13 व्या षटकापर्यंत आम्ही सामन्यात होतो पण अखेरच्या चार-पाच षटकात झालेल्या चूका भोवल्या. आयपीएलसारख्या स्पर्धेत दोन चार चेंडूही खराब टाकले गेले, तर मोठा फरक पडत असतो असे पोंटींगने म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button