जाणून घ्या महिला खेळाडूंमध्ये सर्वाधिक कमाई कुणाची?

महिला टेनिसवरील सेरेना विल्यम्सचे साम्राज्य हळूहळू घटत चालले आहे. मातृत्वानंतर विजेतेपदंही तिला हूलकावणी देत आहेत, शिवाय वाढत्या वयाचाही तिच्या खेळावर परिणाम होत आहे. त्यामुळे अलीकडेच महिला टेनिसपटूंमध्ये कमाईतही ती मागे पडली आहे आणि जपानच्या 22 वर्षीय नाओमी ओसाकाने तिच्यापुढे झेप घेतली आहे. सेरेना गेल्या चार वर्षांपासून या यादीत सर्वाधिक कमाई करणारी महिला टेनिसपटू ठरत आलेली आहे पण आता तिच्या या साम्राज्याला नाओमी ओसाकाने शह दिला आहे. विशेष म्हणजे ओसाका असो, सेरेना असो की शारापोव्हा, दरवर्षी महिला खेळाडूंमध्ये टेनिसच्याच खेळाडू कमाईत सर्वात पुढे आहेत.

फोर्बस् मासिकाने दिलेल्या माहितीनुसार ओसाकाने दोनच ग्रँड स्लॅम विजेतेपदं पटकावली असली तरी गेल्या वर्षी बक्षीस रक्कम आणि प्रायोजकत्वातून 374 लाख डॉलरची कमाई केली आहे. ही कमाई सेरेनाच्या गेल्या वर्षीच्या कमाईपेक्षा 14 लाख डॉलरने जास्त आहे. ओसाकाने 2018 मध्ये सेरेना विल्यम्सला नमवूनच यू.एस.ओपनच्या विजेतेपदासह पहिले मोठे यश मिळवले होते. ओसाकाची कमाई ही 12 महिन्यांमध्ये एखाद्या महिला खेळाडूने केलेली ही सर्वाधिक कमाई आहे. तिने 2015 मध्ये मारिया शारापोव्हाने केलेल्या 297 लाख डॉलरच्या कमाईचा विक्रम मागे टाकला.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील आघाडीच्या 100 खेळाडूंमध्ये ओसाका व सेरेना यांच्या रुपात 2016 नंतर प्रथमच दोन महिला खेळाडूंना स्थान मिळाले आहे. या यादीत ओसाका 29 व्या तर सेरैना 33 व्या स्थानी आहे.

टेनिस जगताबाहेरच्या व्यक्तींसाठी ओसाका हा यादीत नवा चेहरा आहे असे क्रीडा व्यवसायाचे प्राध्यापक डेव्हिड कार्टर यांनी म्हटले आहे.

ओसाकाने 2018 मध्ये युएस ओपन जिंकल्यावर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धासुध्दा जिंकली होती. मात्र त्यानंतर तिची कामगिरी घसरली असून ती क्रमवारीत पहिल्या स्थानाहून दहाव्या स्थानापर्यंत घसरली आहे. ओसाका हिचे नाईकी, निस्सान मोटर्स, शिसैदो व योनेक्स यासारख्या ब्रँडसशी प्रायोजकत्वाचे करार आहेत.

सेरेनाने 1999 मध्ये पहिले ग्रँड स्लॕम विजेतेपद पटकावले होते तेंव्हा नाओमी ओसाका फक्त एक वर्षाची होती. 19 वर्षानंतर त्याच ओसाकाने सेरेनाला नमवून पहिले मोठे यश मिळवले आणि आता सर्वाधिक कमाईतही तिला मागे टाकले आहे. तो सामना सेरेनाच्या संतापाने अतिशय वादग्रस्त ठरला होता.

ओसाकाकडे जपान व अमेरिका असे दुहेरी नागरिकत्व आहे पण तिने ऑलिम्पिकमध्ये खेळण्यासाठी जपानला पसंती दिली. यामुळे तिला प्रॉक्टर अँड गॕम्बल, निप्पान एयरवेज व निस्सीन सारखे ऑलिम्पिकचे प्रायोजक मिळाले.

आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सातत्याने टेनिसच्याच खेळाडू आघाडीवर आहेत. गेल्या दशकात तर सेरेना विल्यम्स आणि मारिया शारापोव्हा ह्या दोघीच या यादीत चमकत होत्या. आता नाओमीच्या निमित्ताने वेगळा चेहरा या यादीत आला आहे.

गेल्या दशकभरातील सर्वात धनवान महिला टेनिसपटू

  • 2011- मारिया शारापोव्हा -250 लाख डॉलर
  • 2012- मारिया शारापोव्हा- 271 लाख डॉलर
  • 2013- मारिया शारापोव्हा- 290 लाख डॉलर
  • 2014- मारिया शारापोव्हा- 244 लाख डॉलर
  • 2015- मारिया शारापोव्हा- 297 लाख डॉलर
  • 2016- सेरेना विल्यम्स- 289 लाख डॉलर
  • 2017- सेरेना विल्यम्स- 270 लाख डॉलर
  • 2018- सेरेना विल्यम्स- 181 लाख डॉलर
  • 2019- सेरेना विल्यम्स- 292 लाख डॉलर
  • 2020- नाओमी ओसाका- 374 लाख डॉलर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER