भाजीची आवक वाढली; दर गडगडले

Rice & Vegetabel

कोल्हापूर : आठवडी बाजारात फळ आणि पालेभाज्यांची आवक मोठ्या संख्येने वाढल्याचे रविवारचे चित्र होते. मागील महिन्यात शंभरी पार केलेली फळभाजी आता सरासरी ३० ते ४० रुपये किलोवर आली. पालेभाज्यांची आवक तुफानी झाल्याने काही ठिकाणी १० रुपयास दोन ते तीन पेंढ्या मिळत होत्या. यात मेथीची आवक सर्वाधिक होती. तेल आणि ज्वारीचे दर चढेच असल्याने भाजी स्वस्त झाली असली तरी किराणा अद्याप सर्वसामन्यांच्या खिशाला झळ देणारा आहे.

आठवडी बाजारात मेथी, शेपू, अंबाडा, पालक, चाकवत, पोकळा, या पालेभाज्यांची तुफानी आवक दिसून आली. बाजारपेठेत भाज्यांचे ढीग दिसत होते. उत्तम दर्जाची भाजी सरासरी पाच रुपयाला पेंढी प्रमाणे विकली गेली. कांदा सरासरी ४० रुपये किलो तर बटाटा ४० ते ६० रुपये किलो दर होता. मागील महिन्यात हरभरा भाजी ४० रुपये पावशेर असा दर होता. शेवग्याची आवक वाढली आहे. दहा ते बारा रुपयांच्या चार शेंगा असा दर होता. हिरवी मिरची ५० रुपये किलो तर टोमॅटो २० ते ३० रुपये किलो आहे. आले ५० रुपये किलो आहे. अहमदनगर आणि सोलापूर येथून कांद्याचा मोठी आवक सुरू झाली आहे. इजिप्तचा कांदाही कोल्हापुरात दाखल झाला आहे. कांदा कच्चा असल्याने दर ४० रुपयांच्या आसपास आहेत. बटाट्याचा दर कायम असून ६० रुपये आहे.

मटारची आवक वाढली आहे; दर मात्र ५० रुपये किलो आहे. गवारी १०० रुपये किलो आहे. उर्वरीत सर्व भाज्या ३० ते ४० रुपये किलो आहे. फ्लॉवर अजूनही वाढूनच आहे. २० ते ५० रुपये एका गड्ड्याचा दर आहे. फळांच्या बाजारात नागपूर संत्र्याची चलती आहे. ५० रुपयांना दोन किलो असा दर आहे. ॲपल बोरही २० रुपये किलो आहेत. केळी २० ते ३० रुपये डझन आहे. माल्टाचीही आवक वाढली असून दरही ४० रुपये किलो असा आहे. तासगाव सीताफळ अजूनही १०० रुपये किलोच आहेत. सफरचंदाची आवक कमी झाली आहे, तर पेरूची आवक वाढली आहे. अननसाचे ढीग लागले असून २० ते ३० रुपये दर आहे. काळ्या पाटीचे कलिंगडही दिसू लागले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER