रियाज आणि सराव

Riyaz and Practice

रूचीताला दोन दिवस सुट्टी होती .फार काही कामही नव्हती . तरीही कुठलीतरी अस्वस्थता खूपच होती .न राहवून तिने रियाज करण्यासाठी तानपुरा लावला. यमन सुरू केला. “सखी येरी आली पिया बिन..! “गाता गाता केव्हा संध्याकाळ अंगणात उतरली कळलं नाही. ताना जमत नव्हत्या .तीव्र मध्यमचा वेध घेत राहिली, हळूहळू जमत गेल्या. दोन दिवस सतत ती मनामध्ये ‘ राग ‘ गुणगुणत होती. अखेर तो जमला. प्रत्येक रागाचा एक स्वभाव असतो. तो समजायला वेळ द्यावा लागतो .गात राहावं लागतं आणि हे सूरांशी जोडलेलं नातं म्हणजे तर रियाज ! जो नवनिर्मितीचा आनंद देतो. दोन स्वरांमधली नाजुक गुंफण, शास्त्राच्या चौकटीत राहूनच त्यात “आपला भाव “ओतणे म्हणजे रियाज.

आणि सराव ? वरवर एकच वाटणारी गोष्ट .पण फरक केवढा ! सादरीकरणासाठी सराव केला जातो .लोकांना आवडावा याच्यासाठी त्यात काही सुरावटी मिसळाव्या लागतात. नको वाटत असल्या तरीही ! कारण ती एक परफॉर्मिंग आर्ट आहे. लोकांना काय आवडेल ?त्यांना प्रेयस काय? मनोरंजन, करमणूक कशी होईल ? हे विचारात घेऊन त्यानुसार केलेला तो सराव !

फ्रेंडस ! हा रियाज आणि सराव यातला जो फरक आहे ना ,त्याचाच लपंडाव हा व्यक्तीच्या आयुष्यात सुरू असतो बघा! मग ती व्यक्ती स्त्री असो की पुरुष.

“काय पुढे शिकायचं म्हणते. झाड नाही पैशाचं बाई तुझ्या बापाकडे ! डिग्री मिळाली तेवढी पुरे झाली आता लग्न करायचं. इतका पैसा खर्च करू शिक्षणावर तर लग्नात पैसा कुठून आणू?”

“रात्री अकरा साडेअकराला ऑनलाईन असतेस. कुणाशी बोलत होतीस ? मी बाहेरगावी असल्याने तुला तर चांगलंच रान मोकळं होतं चॅटिंगसाठी”.

आजकाल चालता बोलता मुलींना छेडण्याची पैज पण लागते मुलांमध्ये फक्त टाईमपास. मग ती जर काही बोलली तर ती लगेच उपलब्ध. हसून बोलली तर छचोर! तटस्थ राहिली तर गर्विष्ट. मॉडर्न कपडे घातले तर फटाकडी अन् साधी राहिली तर काकू बाई! थोडक्यात काय तिने काहीही केलं तरी एक लेबल तिला लागतच!

पुरुषांचीही यातून सुटका नसतेच.”अरे! तो म्हणजे बायकोच्या ताटाखालचे मांजर आहे. पहा घाबरतो तो बायकोला” . किंवा” अबे एक शिटी मारून दाखव तिला, मगच मानु तू खरा मर्द आहेस. “अशा प्रकारचे उद्गार माणसांनाही ऐकावे लागतात.

किंवा “मी किती समजावून सांगते त्यांना. त्यांनी थोड व्यवहार चातुर्याने वागावं. थोडं जबाबदार व्यक्ती सारख वागावं. पण निर्णय म्हणून काही त्यांना घेता येत नाही. म्हणून त्यांचा उद्योग बुडाला. सतत चिडचिड .फक्त मला घोड्यावर बसवा.”

थोडक्यात काय तो असो की ती, कोणत्याही व्यक्तीची यातून सुटका नाही हे तर वास्तव आहे पण खरे दुःख हे नाहीच.

” मी “या एक अक्षरी शब्दात पूर्ण माझं अस्तित्व खरं तर सामावलेलं आहे. याची माझी मलाच ओळख आहे का ? परंतु मला वाटतं प्रत्येक व्यक्तीची माझी स्वतःची काही ओळख म्हणजे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असायलाच हवा .आपली आपल्याशी छान मैत्री असायला हवी. पण चित्र मात्र वेगळच दिसत .दोघांचेही रिमोट बाहेरच्या परिस्थिती नुसार हलत राहतात. स्वतःच्या मनाप्रमाणे हलवावेत, किंवा असं काही होत आहे असा विचार करायलाही वेळ नसतो. मग या साठी घडणचं कशी असावी लागते. स्वतःशी मैत्री म्हणजे आपल्या बुद्धी आणि मनाशी मैत्री ,त्याच्यावर विश्वास ठेवणे आणि मुख्य म्हणजे जपणे ही गोष्ट खूप दुर्मिळ असते. सुंदर असते .पण त्याबरोबर निर्णय घेण्याबरोबरच निर्णयाच्या सर्व परिणामांचा विचार करून त्याबरोबर येणारी जबाबदारी स्वीकारायची आणि ती पार पाडावी लागते.

पण बरेचदा होतं काय ? हे जमून येण्यासाठी, आपल्या प्राथमिकता ज्या ठरवाव्या लागतात, त्याच न ठरवता आंधळेपणाने केवळ गरज ,कर्तव्यभावना ,अपेक्षा पूर्ती साठी काम केले जाते. पण मन मारून केलेल्या कामांमध्ये असते नाराजी . आणि आपण त्या त्या पारंपारिक साच्यात घड्याळाच्या काट्या बरोबर केवळ घाण्याच्या बैलासारखे फिरतो ,ते फक्त समाजस्वीकृती आणि संबंधित माणसांना खुश ठेवण्यासाठी असते. यात आनंद आणि समाधानही असतं. नाही असे नाही पण साध्य ते असत नाही तर ते केवळ बायप्रॉडक्ट असू शकत. काहींच्या बाबतीत वास्तविक पाहता आपण आनंदी असू तरच संबंधित माणसं खुश असतात .परंतु इथेच सगळी गाडी अडते.

म्हणजे बघा कोणा एकेका व्यक्तीला गच्चीत व्यायाम करायला आवडतो. टेरेसवर कॉफी प्यायला आवडते, घराच्या हॉल मध्ये गाण्याची मैफल जमवायला आवडते, घरात हस्तकौशल्य च्या वस्तू करायला आवडतात, बाहेरचे पदार्थ खायला आवडतात , निरुपयोगी अशी खरेदी करायचा मूड होतो, टीव्हीची अमुक मालिका आवडते किंवा मॅचेस बघायला आवडतात, ट्रेकिंग आवडतं, कुणाला एकट बसायला आवडतं, नाहीतर चहूबाजूंनी लोक जमवायला आवडतात ,बडबड करायला आवडते, लोकांची सेवा करायला आवडते ,फोटोग्राफी करत फिरायला आवडतं….? अरे बापरे…..! व्यक्ती तितक्या प्रकृती !

पण बरेचदा त्याला किंवा तिला आवडत नाही, म्हणून अमुक एक गोष्ट टाळली जाते. स्वतःच्या आवडीनिवडी कपाटात बंद होतात .कधीकधी व्यक्ती परस्परांना मालकीहक्क प्रमाणे जखडून ठेवतात किंवा काही व्यक्ती नकळत संस्कारांमुळे जखडलेल्या जाऊन त्यागमूर्ती ठरतात. सगळच काही विचित्र !

आवडीनिवडी एकच असल्या पाहिजे हा अट्टाहास कशाला ? उलट परस्परांच्या आवडींना, मतांना, इच्छांना प्रोत्साहन देणे ,मोकळीक देणं खूप महत्त्वाचं ! घरातील पाच लोक वेगवेगळ्या परिघात फिरत असतील तरी ते कुठेतरी परस्परांना छेदतातचं. उलट त्यामुळे त्या सगळ्यांचा परीघ विस्तारत जातो. परस्परांना साथ देताना स्वतंत्र अवकाश देणारी घरे नक्कीच उभी राहू शकतात. स्वतःच्या चाकोरीतून बाहेर पडलं तर मन मारून जगणारे काही लोक आहेत पण विपरीत परिस्थितीतही स्वतःच्या आनंदासाठी जगताना सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्याची लढाई लढताना देखील लोक दिसतात. धुणी भांडी करणाऱ्या कामकरी स्त्रिया जेव्हा दवाखान्यात येतात, तेव्हा शेजाऱनी ,बहिणी जावा, ननंडेची ननंद ,अशा एकमेकांबरोबर येतात. छोटी छोटी लागून लागून घर असतात. सगळी सुखदुःख एकमेकींना बिनबोभाट माहिती असतात. एखादा सणाला सुट्ट्या मारून अगदी नटून थटून सेल्फी देखील काढताना दिसतात.

फ्रेंड्स ! वर बघितल्याप्रमाणे जो नवनिर्मितीचा आनंद देतो, स्वतःतल्या आनंदाला जागा करून देतो, जगण्याच्या चौकटीतही “आपला भाव” ओतू देतो, काही स्वतःची व्यक्तिगत विशेषत्व नोंदवू देतो , “माझं मी पण” जपून, कर्तव्यपूर्ती साठी प्रयत्न जिथे करता येतात, इतरांसाठी जगताना देखील मला माझ्यासाठी जगता येतं तो असतो माझा जगण्याचा रियाज.

आणि फक्त आणि फक्त इतरांच्या इच्छा, गरजा ,अपेक्षा यांच्यासाठी डोळ्यावर पट्टी बांधून वर्तुळात फिरत राहणे तो असतो सराव!

आणि म्हणूनच मला असं वाटतं तुम्ही आयुष्यातला सराव आणि रियाज ओळखायला शिका. निवड कशाची करायची ! बघा तर जरा !

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button