लाखो कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ  र.ग.कर्णिक यांचे निधन

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आधारस्तंभ, महान कर्मचारी नेते र.ग.कर्णिक यांच्या निधनाने एका पर्वाची अखेर झाली आहे. राज्यातील लाखो कर्मचाºयांसाठी पाच दशके विविध लढे देणारे कर्णिक यांच्या निधनाने एका अत्यंत संघर्षशील जीवनाची अखेर झाली. कर्णिक मृत्यूसमयी ९१ वर्षांचे होते. कर्मचाऱ्यांच्या लढ्याचा इतिहास र.ग.कर्णिक या नावाशिवाय अपूर्णच राहील. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी त्यांनी दीर्घकाळ संघर्ष केला.

कर्मचाऱ्यांच्या दोनवेळच्या ऐतिहासिक आणि गाजलेल्या संपाचे ते प्रमुख नेते होते. वेळप्रसंगी अत्यंत आक्रमक पण त्याचवेळी कमालीचा संयम बाळगणारे कर्णिक हे एक अजब रसायन होते. कर्मचारी हित या एकाच विषयासाठी त्यांनी हयातभर कार्य केले. मंत्रालयात एक सामान्य कर्मचारी म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेले कर्णिक यांची कर्मचारी नेते म्हणून पुढे कारकिर्द बहरली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांशी त्यांचे अत्यंत निकटचे संबंध राहिले पण कर्मचारी हिताशी त्यांनी कधीही तडजोड केली नाही. लढाऊ बाणा आयुष्याच्या शेवटपर्यंत कायम ठेवला. कर्णिक यांच्या पार्थिवावर हजारो कर्मचाºयांच्या उपस्थितीत दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले तेव्हा अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

कर्णिक हे एक व्यक्ती नव्हते ते एक संस्था होते. हजारो-लाखो कर्मचाºयांना त्यांनी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी  संघटनेशी जोडले. अनेक आंदोलनांचे यशस्वी नेतृत्व केले. प्रसंगी संपाचे हत्यारही उपसले पण शासनाशी तुटेपर्यंत त्यांनी कधीही ताणले नाही. अनेकदा त्यांच्यातील नेतृत्वाची कसोटी लागली पण ते प्रत्येक कसोटीवर खरे उतरले. राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे ते पाचदहा नव्हे तर तब्बल ५२ वर्षे सरचिटणीस होते. कर्मचाºयांच्या अखिल भारतीय संघटनेचे ते ३७ वर्षे अध्यक्ष राहिले. हा एक जागतिक विक्रमच म्हटला पाहिजे.

कर्णिक यांच्या निधनाने एक महान कर्मचारी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER