बुद्धिबळाच्या नियमात क्रांतिकारी बदल; अनिर्णीत लढती बाद

chess - Maharastra Today
chess - Maharastra Today

बुद्धिबळाला (Chess) कित्येक दशकांचा इतिहास आहे. गेल्या शेकडो वर्षांत या खेळांचे नियम विकसित झाले आहेत आणि बुद्धिबळातील शेवटचा महत्त्वाचा बदल १८६० मध्ये झाला होता. त्यावेळी स्टॉंटन (Staunton) यांनी या खेळाचे नियम ठरवले होते. त्यावेळीच पांढऱ्या सोंगट्या (White pieces) पहिली चाल खेळतील, लढतीत निर्णयाची शक्यता नसेल तर ती अनिर्णीत (Draw) किंवा बरोबरीत मानली जाईल आणि प्यादे एन पॅसेंट (En passent) पद्धतीने बाद करता येतील हे सर्वांनी मान्य केले होते.

गेल्या दीडशे वर्षांपासून बुद्धिबळाचे नियम आहे तसेच आहेत; परंतु अलीकडे बऱ्याच स्पर्धांतील लढती अनिर्णीत सुटत आहेत. यामुळे प्रेक्षकांची निराशा होत आहे आणि त्यांना आपली फसवणूक झाल्यासारखे वाटते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे २०१८ ची विश्व अजिंक्यपद स्पर्धा! मॕग्नस कार्लसन व फॕबियानो कारुआना दरम्यानच्या त्या लढतीतील १२ च्या १२ डाव अनिर्णीत राहिले होते.

पारंपरिक बुद्धिबळातील अनिर्णीत लढतींचा हा प्रश्न सोडविण्यासाठी जागतिक बुद्धिबळ नियंत्रण संस्थेने (FIDE) आता कठोर पावले उचलली आहेत आणि ते तत्काळ लागूसुद्धा केले आहेत. त्यात खेळाडूंच्या आपसातील सहमतीने लढत बरोबरीत म्हणजे अनिर्णीत सोडण्यास आता मनाई करण्यात आली आहे. त्यावर जोरदार अनुकूल व प्रतिकूल मते व्यक्त होता ट्विटरवर चेस रुल हॕशटॕग ट्रेंडिंगमध्ये होता.

लढत अनिर्णीत सोडवण्यास मनाई करण्यात आली असून अतिशय कंटाळवाण्या रुक एण्डगेमची स्थिती आली तरी खेळ संपेपर्यंत खेळावे लागणार आहे. ऑनलाईन खेळासाठीही हा नियम लागू करण्यात आला आहे. चेस डॉट कॉम या संकेतस्थळानेही आपल्या साईटवरून ‘ऑफर ड्रॉ’ हा पर्यायच हटविला आहे.

ग्रँडमास्टर जोन लुडवीग हॕमरने काही दिवसांपूर्वी असाच अनिर्णीत लढती रद्द करण्याचा विचार मांडला होता; पण त्याला कुणीच गंभीरतेने घेतले नव्हते.

याच प्रकारे ‘स्टेलमेट’बाबतही निर्णय घेण्यात आला आहे. आता नव्या नियमानुसार स्टेलमेटच्या स्थितीत पटावर ज्याचे वर्चस्व असेल, ज्याने प्रतिस्पर्ध्याला सर्व वैध चालींबाबत जकडलेले असेल त्याला विजेता घोषित करण्यात येणार आहे.

याचप्रमाणे तीच तीच चाल तीन वेळा खेळणाऱ्या खेळाडूबद्दलही नियम कडक करण्यात आला आहे. आता जो खेळाडू तिसऱ्यांदा चाल रिपिट करेल त्याला पराभूत घोषित करण्यात येईल आणि अशा खेळाडूला सीएम म्हणजे काॕवर्डली मास्टर हा किताब देण्यात येणार आहे जेणेकरून सर्वांच्या लक्षात येईल की ह्या खेळाडूत जिंकण्यासाठी चाली करण्याचे धाडस नाही.

चालींच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. ५० चालीपर्यंत कोणतीही सोंगटी पटकावली नसेल आणि प्याद्यांच्या चाली रचल्या नसतील तर ती लढत अनिर्णीत मानली जाईल असा नियम होता. आता ही चालींची मर्यादाच काढून घेण्यात आली आहे. म्हणजे असंख्य चालींपर्यंत खेळ सुरू राहील. तसे होऊ नये यासाठी १०१ चालीनंतर प्रत्येक चालीनंतर एक खेळाडू दुसऱ्याच्या पोटरीवर प्रहार करेल आणि हे जोपर्यंत एक खेळाडू हार मानत नाही किंवा खुर्चीतून कोसळत नाही तोवर सुरू राहील असा आता नवा नियम आहे. राजांनाही एकमेकांना बाद करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button