महसूल कर्मचाऱ्यांनी केली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

रत्नागिरी(प्रतिनिधी) : मागण्या तत्वत: मान्य होऊनदेखील त्याची अंमलबजावणी न झाल्याने जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी गुरूवारी येथील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. शासनाने याची दखल न घेतल्यास येत्या ५ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्यांना शासनाने तत्वत: मान्यता देऊन सहा वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरीही शासनाने अद्याप कोणतेही आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे शासनाकडून फसवणूक केली जात असल्याची भावना महसूल कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. याविषयी पुण्यात ३० जून रोजी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार राज्य महसूल कर्मचारी संघटनेने आंदोलनाला ९ जुलैपासून पुन्हा टप्प्याटप्प्याने प्रारंभ केला आहे. यातील दुसऱ्या टप्प्यात गुरूवार, ११ रोजी दुपारी भोजनकाळाच्या सुट्टीत रत्नागिरी जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे अध्यक्ष अमर घोसाळकर, सरचिटणीस मंदार दामले आणि कार्याध्यक्ष सुनील कीर यांच्या नेतृत्वाखाली जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली.

यापुढील निदर्शने येत्या २३ रोजी दुपारच्या भोजनाच्या सुट्टीत घंटानाद करून करण्यात येणार आहेत. ३० रोजी काळ्या फिती लावून काम करणे, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी १ तास जादा काम करून शासनाचा निषेध करणे, १६ ऑगस्ट रोजी संगणक – लेखणी बंद आंदोलन, २१ रोजी सामुदायिक रजा टाकून धरणे आंदोलन, २८ रोजी लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. या आंदोलनांची दखल शासनाने न घेतल्यास शेवटच्या टप्प्यात ५ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व महसूल कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.