मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरु करण्याचा पुनर्विचार करावा : देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Devendra Fadnavis - Uddhav Thackeray

मुंबई :- मागील महायुती सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेला फेलोशिप कार्यक्रम आवश्यक बदलांसह पुन्हा सुरु करण्याच्या व सध्या कार्यरत फेलोयोजना कार्यकाळ पूर्ण करू देण्याची मागणी विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 31 मार्च 2020 पासून बंद करण्याचा शासनाचा निर्णय असल्याची माहिती आहे. या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. माझ्या मुख्यमंत्री पदाच्या काळात या पदासाठी दरवर्षी सुमारे 4 ते 5 हजार अर्ज येत होते. त्यातून ऑनलाईन अर्ज, परीक्षा, निबंध लेखन, मुलाखत अशा माध्यमातून 50 युवकांना निवडल्या जात होते.

शिवजयंती निमित्त मनसे तर्फे ३ हजार झेंड्यांचे वाटप

जात, धर्म, लिंग याबाबींचा विचार न करता ही मुले गुणवत्तेच्या आधारावर या मुलांची निवड केली जात होती. ही मुले शिक्षणाने व व्यवसायाने डॉक्टर, अभियंता, चार्टर्ड अकाउंटंट, वास्तरचनाकार, नगरनियोजन, समुपदेशक होती. अनेक नामवंत संस्थांमधून या मुलांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते. खाजगी क्षेत्रातील चांगल्या नोक-या व पगार सोडून ही मुले प्रशासनाचा अनुभव मिळवण्यासाठी व राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी आली होती. निवड प्रक्रियेत राजकीय हस्तक्षेप होऊ नये याची विशेष काळजी घेतली गेली होती, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. दरवर्षी निवडलेले हे फेलोज मुख्यमंत्री कार्यालयापासून ते गडचिरोली, नंदुरबार या सारख्या दुर्गम जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राज्यभर 11 महिन्यांसाठी काम करायची. प्रशासकीय चौकटीपलिकडे विचार करू शकणा-या युवांचा प्रशासनातील सहभाग हे एक प्रकारचे व्यवस्थेतील इनोव्हेशन म्हणता येईल.

सामाजिक, आर्थिक विकासासाठी बिगर शासकीय संस्थांना शासनासोबत जोडणे यासाठी दुवा साधण्याचे काम हे फेलो करत होते. शिक्षण आरोग्य, रोजगार निर्मिती यासाठी अनेक कंपन्या, संस्था आणि शासनाची कार्यालये यांच्यात सामंजस्य करार घडवून आणण्यामध्ये या फेलोजची मदत झाली. मुख्यमंत्री कार्यलायतील वॉर रूम, सिडको, पीएमआरडीए येथील फेलोंनी पायाभूत सुविधा प्रकल्पांचे सनियंत्रण व विविध विभागांतील समन्वयामध्ये महत्वाची भूमिका बजावल्याचे फडणवीस म्हणाले.

त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभाग यासारख्या कार्यालयांसोबत काम करणाऱ्या फेलोजनी महिला बचतगटांची उत्पादने ई-कॉमर्स माध्यमांवर विक्रीसाठी आणणे, स्थानिक कारागिरांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विशेष कार्यक्रम, असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. त्याचप्रमाणे राज्याचे स्टार्टअप विषयक धोरण व त्याची अंमलबजावणी यामध्येही फेलोजचा महत्वपूर्ण सहभाग होता, असे ते म्हणाले. महाराष्ट्राने सुरु केलेल्या हा कार्यक्रम पंजाब, हरियाणा, झारखंड, छत्तीसगढ, दिल्ली अशा अनेक राज्यांनी राबविला. जुलै, ऑगस्ट महिन्यात या फेलोजचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्यापूर्वीच मार्च महिन्यात त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे युवकामंध्ये शासनाप्रती चुकीचा संदेश जात असल्याचे मला वाटत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे किमान त्यांना त्यांचा कार्यकाळ पूर्ण करण्याची संधी मिळावी, असे माजी मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.