कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ‘या’ ठिकाणी निर्बंध

Coronavirus

मुंबई : कोरोना संकटाच्या (Corona Crises) पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं म्हटलं आहे. आगामी काळात लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात येईल. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय सुचवण्यात आला आहे, तर उपाहारगृहे, चित्रपटगृहे ही गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

शेतीविषयक कामे सुरू
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहतील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी :
– राज्यात १४४ कलम लागू केले जाईल.
– सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल.
– रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.
– बागा, चौपाट्या, समुद्रकिनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील.
– दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोक आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करत आहेत, असं निदर्शनास आल्यास स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करू शकतं.
आवश्यक सेवेतील दुकानेच सुरू राहतील :
किराणा, औषधे, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा ३० एप्रिलपर्यंत बंद राहतील.
सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरू राहणार :
– सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील.
– रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
– सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही.
– आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
– बसचालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे.
– बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद
– खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील.
– केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.
शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत
– शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती ५० टक्के मर्यादेपर्यंत राहील.
– शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल.
– आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभागप्रमुखाचा प्रवेश पास लागेल.
– कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात.
– केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.
मनोरंजन, सलून्स बंद
– मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील.
– चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू
– उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेले पाहिजेत, याची काळजी घ्यावी.
– चित्रपटांचं चित्रीकरण सुरू ठेवता येईल, पण जास्त गर्दी करता येणार नाही.
– सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची RTPCR चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
– १० एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.