राज्यपालांसारखाच मंत्रिमंडळालाही मान, एका हाताने टाळी वाजत नाही ; छगन भुजबळांचे टीकास्त्र

Chhagan Bhujbal

नाशिक : गेल्या काही महिन्यांपासून राजभवन आणि मुख्यमंत्री कार्यालयामध्ये अंतर निर्माण झाले. राज्यपालांचा जसा मान आहे, तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केले पाहिजे. एका हाताने टाळी वाजत नाही, अशा शब्दात अन्न आणि नागरी पुवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची कानउघाडणी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री कार्यालयातील तणाव वाढत चालला आहे. एकमेकांचा मानसन्मान राखणं गरजेचं आहे. राज्यपालांचा जसा मान आहे तसाच मान मंत्रिमंडळाचादेखील आहे. टाळी एका  हाताने वाजत नाही. राज्यपालांनीसुद्धा नियमाप्रमाणे काम केलं पाहिजे. मंत्रिमंडळाने दिलेल्या १२ विधानपरिषदेच्या आमदारांच्या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नाही, असे भुजबळ म्हणाले. तसेच राज्यपाल आणि CMO या दोघांमधील अंतर कमी करण्याची आवश्यकता असल्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

राज्यपाल आणि राष्ट्रपती या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या भूमिकेवर भाष्य केले. ते म्हणाले “मी १९८५ पासून विधानमंडळात आहे. मात्र, असे कधीही घडलेले मला आठवत नाही. मुख्यमंत्र्यांनी  नाव पाठवल्यावर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आमदारांच्या नावावर सही व्हायची. अटलजींच्या, शिवसेनेच्या काळातदेखील असेच होते . १९९५ साली काँग्रेसप्रणीत राज्यपाल होते. त्यावेळी अचानक सरकार बदलले .

तरीसुद्धा राज्यपालांनी तत्काळ त्यावर सही केली. त्यामुळे राज्यात कोण जास्त राजकारण खेळतंय हे पाहणं गरजेचं आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी राजकारण करू नये, असा शिरस्ता आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे ११ फेब्रुवारी रोजी उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले होते .आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं होतं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. या प्रकारानंतर महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका झाली. याच टीकेला भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER