ग्रामीण भागात ८ लाख घरकुले निर्मितीचा संकल्प

Hasan Mushrif

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरीकांना हक्काचा निवारा देण्यासाठीव महाआवास अभियान-ग्रामीण राबविले जाणार आहे. राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन २० नोव्हेंबर २०२० ते २८ फेब्रुवारी२०२१ या शंभर दिवसात आठ लाख ८२ हजार १३५ घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार केला असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी सांगितले.

अभियानात केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण योजनांतर्गत राज्यास एकूण १६ लाख २५ हजार ६१५ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ११ लाख २१ हजार ७२९ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. गवंडी प्रशिक्षणांतर्गत ग्रामीण भागात कामे वेळेवर व दर्जेदार होण्यासाठी ३३ हजार गवंड्यांना संस्थामार्फत प्रशिक्षण व साहित्य संच देण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या आवारामध्ये एका डेमो हाऊसची उभारणी करण्यात येणार आहे.

घरकुल बांधकामासाठी स्वत:ची जागा नसलेल्या राज्यातील सुमारे ७३ हजार लाभार्थ्यांची जागेची अडचण दूर करण्यासाठी अभियान कालावधीत विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. पंडीत दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेंतर्गत जागा खरेदीसाठी ५० हजारपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शासकीय जमिन विनामूल्य उपलब्ध करुन देणे, ग्रामीण भागातील निवासी प्रयोजनासाठीची अतिक्रमणे नियमानुकूल करणे या उपाययोजना करण्यात येणार आहेत. अनुदानाव्यतिरिक्त बँकेमार्फत ७० हजारांचे कर्ज उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. अभियान पूर्ण झाल्यानंतर उत्कृष्ट काम करणारे विभाग, जिल्हा, तालुका तसेच ग्रामपंचायत व आदर्श लाभार्थी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER