निवासी डॉक्टरांनी रुग्णांना जीवदान देऊन धर्म रक्षणाचे कार्य केले: राज्यपाल

50 resident doctors of the state felicitated at Raj Bhavan

करोना संक्रमण (Corona) काळात सर्व लोक भीतीने घरात असताना राज्यातील निवासी डॉक्टरांनी सर्वप्रथम करोना रुग्णांना सामोरे जात त्यांना जीवदान देऊन धर्म रक्षणाचे कार्य केले, असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी आज येथे काढले.

‘सेवा परमो धर्म:’ हे आपल्या देशातील तत्वज्ञान आहे. ‘मनुष्य सेवा हीच ईश सेवा आहे’ असे मानले गेले आहे. त्यामुळे रुग्णांचा जीव वाचवून निवासी डॉक्टरांनी एक प्रकारे धर्म वाचविला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

महाराष्ट्र निवासी डॉक्टर्स राज्यव्यापी संघटना (मार्ड) (Maharashtra Association of Resident Doctors) च्या वतीने राजभवन येथे राज्यातील ५० निवासी डॉक्टरांचा करोना काळातील उल्लेखनीय कार्याबद्दल प्रातिनिधीक स्वरूपात सत्कार करण्यात आला, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

ज्यावेळी आपण रुग्णांची सेवा करता त्यावेळी रुग्ण मनापासून आपल्याला आशिर्वाद देतात. रुग्णांकरिता डॉक्टर देवदूत असतात. अश्यावेळी डॉक्टरांनी रुग्णांप्रती करुणा बाळगून सेवा केली तर पगाराशिवाय पुण्य व आशीर्वाद देखील आपसूकच प्राप्त होतील, असे राज्यपालांनी सांगितले.

सर्व निवासी डॉक्टरांनी ध्येय, समर्पण भाव व निष्ठेने कार्य केल्यामुळेच देशातील करोना संसर्ग नियंत्रणात आल्याचे सांगून, नवा करोना जीवाणू आला तरी देखील त्यावर आपण निश्चितपणे विजय मिळवू, असा आशावाद राज्यपालांनी जागविला.

सर्वत्र परीक्षा नको असा सूर असताना वैद्यकीय शिक्षण विद्यार्थ्यांनी हिमतीने परीक्षाही दिल्या व करोना विरुद्ध लढा देखील यशस्वीरित्या दिला असे सांगून राज्यपालांनी निवासी डॉक्टरांचे अभिनंदन केले.

“आठ-आठ तास करोना रुग्णाजवळ बसून जीव वाचवले” : डॉ. तात्याराव लहाने

करोना काळात वरिष्ठ डॉक्टर्स घरी असताना स्वतःचा जीव धोक्यात टाकून रुग्णांना सेवा देणारे निवासी डॉक्टर्स सच्चे करोना योद्धे असल्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी यावेळी सांगितले.

निवासी डॉक्टरांनी पीपीई कीट घालून ८ – ८ तास अन्न – पाणी न घेता अतिदक्षता विभागात रुग्णांजवळ बसून रुग्णांची सेवा केली. त्यांच्या प्रयत्नामुळे आपण करोनाला परतवून लावले, असे लहाने यांनी सांगितले. आपल्या आवाहनाला प्रतिसाद देत संपूर्ण करोना काळात मार्डच्या निवासी डॉक्टरांनी संप न करून शासनाला सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांच्या कामाला तोड नाही असे सांगताना राज्यपाल कोश्यारी, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे सर्व वैद्यकीय परीक्षा नीटपणे पार पडल्या, असे आरोग्य विज्ञान विद्यापिठाचे कुलगुरू डॉ दिलीप म्हैसेकर यांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांचा सत्कार राज्यपालांनी केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना निवासी डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू असे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले.

मार्डचे अध्यक्ष डॉ राहुल वाघ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राज्यातील विविध जिल्ह्यातील निवासी डॉक्टरांचा राज्यपालांच्या हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ राहुल वाघ, डॉ. आबासाहेब तिडके, डॉ. अजित माने, डॉ अक्षय चावरे, डॉ. अमय सदर, डॉ. अमीर तडवी, डॉ. अमित अवचट, डॉ. अमोल बांगर, डॉ. अर्पित धकाते, डॉ. अरुण घुले, डॉ. अशिष पाठक, डॉ. अविनाश दहिफळे, डॉ.अविनाश सक्नुरे, डॉ. धनराज गित्ते, डॉ. ज्ञानेश्वर ढोबळे, डॉ.गोपाल कांळबांडे, डॉ. गोपीकृष्णन पलानवेल, डॉ. माधव भोंडवे, डॉ. मारुती वाकोडे, डॉ. मयुरी घाटगे, डॉ. मुकुल देशपांडे, डॉ.निलेश कल्याणकर, डॉ. निशांत जगदळे, डॉ. नितीन मुंडे, डॉ. प्रदीप सुक्रे, डॉ. प्रशांत जाधव, डॉ. प्रशांत मुंडे, डॉ. राहुल दुबळे, डॉ. राहुल राजेंद्र वाघ, डॉ. रणजीत खरोले, डॉ. साकेत मुंदडा, डॉ. संदीप हाडे, डॉ. सतीश तांदळे, डॉ. शरयु सुर्यवंशी, डॉ. शर्विरा रणदिवे, डॉ. श्रीलीना दमुका, डॉ. सुचित बारापात्रे, डॉ. सुप्रिया बनसोडे, डॉ. स्वप्न‍िल काजळे, डॉ. वरुण सानप, डॉ. विजयकुमार पवार , डॉ. विक्रांत पाखरे, डॉ. विपीन खडसे, डॉ. यश थोरात, डॉ. मुयुरी तोडकर, डॉ. प्रियंका पांजरकर, डॉ. पुजा घुमरे व अमित सुर्यवंशी पाटील, अक्षय कर्डिले, यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER