आरक्षण आणि सिनेमा

Reservations and movies

सध्या सगळीकडे आरक्षणाच्या विषयाने जोर धरलेला आहे. मागील सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना आरक्षण दिलेही. मात्र त्या आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि न्यायालयाने आरक्षण रद्द केले. यामुळे अनेक मराठा मुलांचे नुकसान होत आहे. मागील सरकारने आर्थिक आणि सामाजिक मागस स्तर असा नवा वर्ग तयार करून आरक्षण दिले. समाजात आरक्षणाचा विषय फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे चित्रपटातही आरक्षणाचा विषय अधे मधे येत असतो. बॉम्बे टॉकीजपासून प्रकाश झा, सत्यजित रे ते अगदी बासु चटर्जीपर्यंत अनेक विख्यात दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटात जात आणि आरक्षण विषयाला हात घातला होता. अशाच काही चित्रपटांवर एक नजर-

भोपाळमधील एस. एम. टी. कॉलेजमध्ये प्रभाकर आनंद (अमिताभ बच्चन) नावाचा एक तत्त्वनिष्ठ प्राचार्य असतो. त्याच्या हाताखाली अनेक मुले तयार झालेली असतात. यापैकीच एक दीपक कुमार (सैफ अली खान) असतो. जातीयवादामुळे त्याला नोकरी मिळत नाही म्हणून प्रभाकर त्याला आपल्या कॉलेजमध्येच तात्पुरती नोकरी देतात. प्रभाकर यांची मुलगी पूर्वी (दीपिका) दीपक कुमारच्या प्रेमात आहे. सुशांत (प्रतिक बब्बर) हा त्यांचा मित्र आहे. याच दरम्यान मंडल आयोगाच्या शिफारसी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लागू होतात, त्यामुळे सरकारी संस्थांमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण वाढवले जाते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे एका समाजात असंतोष तर दुसऱ्या समाजात जल्लोष निर्माण होतो.सगळीकडे याचे पडसाद उमटतात. याचा चित्रपटातील या भूमिकांवर काय आणि कसा परिणाम होतो ते प्रकाश झा यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. प्रेक्षकांनाही प्रकाश झा यांच्या आरक्षणाची ही कथा प्रचंड आवडली होती. मात्र मध्यंतरानंतर चित्रपटाने वेगळा मार्ग पत्करल्याने मूळ आरक्षणाचा मुद्दा बाजूला राहून तो टिपिकल हिंदी चित्रपट झाला होता.

दलितांवरील अत्याचाराला चित्रपटातून वाचा फोडण्याचे काम स्वातंत्र्यपूर्व काळापासून होत आले आहे.  बॉम्बे टॉकिजने 1936 मध्ये अछूत कन्याची निर्मिती केली होती. अशोक कुमार आणि देविका राणी यांच्या मुख्य भूमिका होत्या. यात देविका राणी यांनी दलित मुलीची भूमिका साकारली होती. दलितांना कसे अत्याचार सहन करावे लागतात ते यात दाखवण्यात आले होते.

बिमल रॉय यांनीही सुजातामध्ये दलित मुलीवर होणाऱ्या अत्याचाराची कथा मांडली होती. यात नूतनने मुख्य भूमिका साकारली होती.

सत्यजीत रे यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या कथेवर आधारित सद्गती चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात ओम पुरी आणि स्मिता पाटील यांच्या मुख्य भूमिका होत्या. यातही दलित दांपत्याची होणारी परवड सत्यजित रे यांनी मांडली होती. त्यानंतर असा विषय फक्त तोंडी लावण्यापुरता अनेक निर्मात्यांनी घेतला होता. परंतु त्यात प्रामाणिकपणा नव्हता.

कौटुंबिक चित्रपट बनवण्यात बासु चटर्जी यांचा हातखंडा होता. त्यांनीही चमेली की शादी चित्रपटात विनोदाची पखरण करीत जाती-पातीतील भेदभावाचा मुद्दा मांडला होता. अनिल कपूर, अमृता सिंह आणि अमजद खान अभिनीत या चित्रपटात दोन जातींमधील तरुण-तरुणीची प्रेमकथा मांडण्यात आली होती. हसत खेळत बासु चटर्जी यांनी समाजातील या दोषावर बोट ठेवले होते.

शाम बेनेगल यांनी अंकुर चित्रपटातही शबाना आझमी आणि अनंत नाग यांना दलित दांपत्याच्या भूमिकेत समोर आणले होते. या दोघांना समाजात कशा प्रकारे अन्याय सहन करावा लागतो आणि त्यावर ते कशी मात करतात ते बेनेगल यांनी टोकदारपणे मांडले होते. प्रिया तेंडुलकरचीही यात मुख्य भूमिका होती. असे अनेक चित्रपट जात, धर्मावर आधारित होते. परंतु त्यांना विशेष यश मिळाले नाही. वर उल्लेखित हे चित्रपट मात्र एकदा अवश्य पाहावेत असे आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER