मराठा समाजाला आर्थिक दुर्बल वर्गातून आरक्षण ; संभाजीराजेंच्या भूमिकेला प्रखर विरोध

Sambhajiraje - Suresh Patil

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर राज्यभरातील मराठा बांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात आलीत. त्यानंतर पुन्हा आरक्षणावर चर्चा सुरू झाली आहे. त्यातच मराठा समाजाला EWS अर्थात आर्थिक दुर्बल घटकांत समावेश न करण्याबाबतची खासदार संभाजीराजे यांनी भूमिका मांडली होती. त्यांची ही भूमिका चुकीची असल्याची प्रतिक्रिया मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील (Suresh Patil) यांनी दिली.तसेच, येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या 3 मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र बंदचा इशारा सुरेश पाटील यांनी दिला.

संभाजीराजे (Sambhajiraje) यांनी EWS आर्थिक दुर्बल घटकांत अनेक जाचक अटी असल्याचं सांगत मराठा समाजाला त्याअंतर्गत आरक्षण देऊ नये, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. ही भूमिका मुख्यमंत्र्यांनीही मान्यही केल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. मात्र आता मराठा आरक्षण संघर्ष समिती अध्यक्ष सुरेश दादा पाटील यांना संभाजीराजेंची ही भूमिका मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षण लढ्यातील विसंवाद पुढे येताना दिसत आहे.

दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे यांची काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यासोबत बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, तसंच मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

यावेळी संभाजीराजेंनी मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटक अर्थात EWS मधून आरक्षण नको असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं. EWSमध्ये आम्हाला तात्पुरतं आरक्षण नको, असं सांगत त्याचे तोटे आम्ही सांगितल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मराठा समाजाला EWS मध्ये न टाकण्याचे तात्काळ आदेश दिले, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER