रिपब्लिकनच्या जिल्हा सचिवांचा आत्मदहनाचा प्रयत्न

Suicide Attempt

सोलापूर :- महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी सुधा साळुंके यांच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हा सचिव विनायक गायकवाड याने शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला महापालिकेतील आयुक्त कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी त्याला पकडून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलविले आहे.

भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ कार्यालयातील अनागोंदी कारभाराबाबत सुधा साळुंके यांच्या विरोधात गायकवाड यांनी तक्रार केली केली होती. गायकवाड यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने साळुंके यांच्यावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांकडे शिफारस करावी, अशी गायकवाड यांची मागणी आहे.

विनायक यांनी ८ ऑक्टोबर निवेदन देऊन सुधा साळुंके यांच्यावर कारयवाई न झाल्यास ३ नोव्हेंबरला आत्मदहन करेन, असा इशारा दिला होता. महापालिका आयुक्त कार्यालयाने या त्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी आत्मदहनाचे टोकाचे पाऊल उचलले.