
मुंबई :- विविध टीव्ही चॅनेल्सच्या दर्शकांची आकडेवारी बनावट पद्धतीने फुगविण्याच्या ‘टीआरपी’ (Television Rating Points) कथित घोटाळ्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एस्प्लनेड कोर्टातील महानगर दंडाधिकाºयांपुढे सादर केलेल्या पहिल्या आरोपपत्रास आव्हान देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) बुधवारी अर्णब गोस्वामी यांच्या ‘रिपब्लिक टीव्ही’ या वृत्तवाहिनीस अनुमती दिली. याची सुनावणी २ डिसेंबर रोजी होईल.
‘एआरजी आऊटलायर मीडिया प्रा. लि.’ या रिपब्लिक टीव्हीच्या मालक कंपनीने केलेली एक याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. ‘टीआरपी’ घोटाळ््यात पोलिसांनी प्रधान संपादक अर्णव गोस्वामी यांच्यासह कंपनीच्या अन्य अधिकाºयांविरुद्ध नोंदविलेला गुन्हा रद्द करावा किंवा त्याचा तपास ‘सीबीआय’कडे सोपवावा, यासाठी ती याचिका आहे. बुधवारी ती याचिका सुनावणीस आली तेव्हा कंपनीच्या वतीने ज्येष्ठ वकील आबाद पोंडा यांनी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रासही आव्हान देण्यासाठी त्याच याचिकेत दुरुस्ती करू देण्याची विनंती केली. मुंबई पोलिसांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी त्यास आक्षेप घेतला. यासाठी आरोपपत्रास नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर आव्हान दिले जात आहे हे स्पष्ट करणारा रीतसर अर्ज करायला हवा, असे त्यांचे म्हणणे होते.
परंतु न्यायालयाने पोंडा यांची विनंती मान्य केली आणि येत्या शुक्रवारपर्यंत मूळ याचिकेत दुरुस्ती करण्यास सांगितले. नंतर पोंडा व सिब्बल या दोघांनीही २ डिसेंबर रोजी सुनावणीसाठी नक्की वेळ देण्याची विनंती केली. मात्र ती अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, आमच्यापुढे इतर पक्षकारांचीही प्रकरणे असतात. एकट्या तुम्हाला नक्की वेळ ठरवून देता येणार नाही.
ही बातमी पण वाचा : ‘टीआरपी’ घोटाळ्यात पोलिसांनी दाखल केले पहिले आरोपपत्र-११ आरोपींनी संगनमताने गुन्हे केल्याचा दावा
-अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला