रिपब्लिक टीव्ही करणार परमबीर सिंग यांच्याविरोधात २०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा

Republic to sue Param Bir Singh

मुंबई : टीआरपी घोटाळ्यातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नाही, असे सरकारच्या वकिलांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात सांगितल्यानंतर रिपब्लिक टीव्हीने मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात २०० कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. रिपब्लिक मीडिया नेटवर्कने एका पत्रकात ही माहिती दिली आहे.

टीआरपी घोटाळा प्रकरणी रिपब्लिक टीव्ही विरोधातील एफआयआर रद्द करण्याबाबतच्या याचिकेवर सोमवारी न्यायालयात सुनावणी झाली. रिपब्लिकच्या पत्रकानुसार, नेटवर्कने लीगल टीमला मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात २०० कोटी रुपयांचा दावा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यात रिपब्लिकच्या संपादकांच्या अब्रू नुकसानी विरोधात १०० कोटी आणि रिपब्लिक मीडिया नेटवर्कच्या नुकसानीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी १०० कोटी रुपयांचा समावेश आहे.

स्वतःच्या आयुक्तांविरोधात मुंबई पोलिसांनी आणि महाराष्ट्र सरकारच्या वकिलांनी आज हायकोर्टात टीआरपी प्रकरणातील एफआयआरमध्ये रिपब्लिक टीव्हीचे नाव नसल्याचे सांगितले. त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, असे रिपब्लिकच्या पत्रकात म्हटले आहे.

अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’ (टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचे बिंग फोडल्याचा दावा या महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचेही त्यांनी सांगितले होते.

रिपब्लिक टिव्हीचा यात सहभाग नसल्याचा दावा करीत या नेटवर्कने एफआयआरमधून आपले नाव वगळण्यात यावे यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER