केंद्रीय मंत्री तोमर, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर गुन्हे नोंदवा

राजकीय सभांवरून हायकोर्टाचा आदेश

Mp HC

भोपाळ : न्यायालयाने याआधी दिलेले अंतरिम आदेश व कोरोना साथ पसरू नये यासाठी लागू असलेले निर्बंध यांचे पालन न करता निवडणूक प्रचाराच्या सभा घेतल्याबद्दल केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर (Narendra Singh Tomar) व माजी मुख्यमंत्री कमलनाथ (Kamalnath) यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्याचा आदेश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने (M.P. High Court) दिला.

मध्यप्रदेशमध्ये सध्या विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्याच्या प्रचारासाठी ५ ऑक्टोबर रोजी तोमर यांनी ग्वाल्हेर शहरात व कमलनाथ यांनी दांतिया जिल्ह्यातील भांडेर गावात घेतलेल्या सभांबद्दल भादंवि व आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये हे गुन्हे नोंदविले जातील. राज्यात कोरोनाची साथ अजूनही जोरात असताना तोंडाला मास्क लावणे, ठरावीक अंतर ठेवणे व ठरावीक मर्यादेहून जास्त लोकांनी एकत्र न जमणे यासारखे निर्बंध धाब्यावर बसवून राजकीय पक्ष, त्यांचे नेते व मंत्री प्रचाराच्या सभा घेत आहेत, अशा जनहित याचिकांवर न्या. शील नागू व न्या. राजीवकुमार श्रीवास्तव यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

न्यायालयाने म्हटले की, निवडणुकीत प्रचार करण्याचा राजकीय पक्षांचा हक्क व नागरिकांचा आरोग्याचा व जगण्याचा हक्क यांचा विचार केला तर नागरिकांच्या मूलभूत हक्कांना अशा वेळी प्राधान्य दिले जायला हवे. खंडपीठाने असेही म्हटले की, जास्तीत जास्त लोकांच्या सभा घेऊन मतांचा हिशेब करणे हेच राजकीय पक्षांचे व त्यांच्या नेत्यांचे प्रमुख उद्दिष्ट दिसते; पण हे करत असताना आपण समाजातील दुर्बल वर्गातील अजाण लोकांचे आरोग्य व जीवन धोक्यात टाकत आहोत, याचे भानही या राजकीय मंडळींना राहात नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER