नवाब मलिकांना बदलवून परभणीला सक्षम पालकमंत्री द्या; प्रहार संघटनेची मागणी

Nawab Mailk - bacchu kadu - Maharashtra Today

परभणी : परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना बदलून त्यांच्या जागी कार्यक्षम पालकमंत्री द्यावा, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. याबाबतचे पत्र प्रहार संघटनेने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

नवाब मलिक हे राज्य सरकारमधील मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्रिपदासह इतरही जबाबदार्‍या आहेत. परिणामी ते परभणी जिल्ह्याला कमी वेळ देत आहेत. यामुळे परभणीला पालकमंत्री नवाब मलिक यांच्याऐवजी दुसरा सक्षम, पूर्णवेळ देणारा कर्तव्यदक्ष पालकमंत्री द्या, अशी मागणी प्रहार संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. ‘गेल्या वर्षी किंवा यंदाचे कोरोना संकट असो… नवाब मलिक यांनी एक जबाबदार पालकमंत्री म्हणून परभणीकडे लक्ष देणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी अजिबात लक्ष दिले नाही.’ असा आरोप शिवलिंग बोधने यांनी केला.

वाढत्या कोरोना काळात त्यांनी तीन महिन्यांनंतर पहिला जिल्हा दौरा केला आहे. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, १ मे आणि १७ सप्टेंबर या शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाव्यतिरिक्त त्यांनी परभणी दौरा कदाचित केला असेल. ते जेव्हा जेव्हा परभणीला पालकमंत्री म्हणून येतात तेव्हा ते अधिकाऱ्यांच्या बैठकी घेतात आणि केवळ आश्वासने देऊन निघून जातात. त्यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात अमलात येत नाहीत. प्रशासकीय स्तरावर कोणतेही काम केले नसल्याचा आरोप शिवलिंग बोधने यांनी केला आहे.

एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शन आणि बेड्सचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत मुंबईत बसून परभणीची देखभाल करणे शक्य नाही. हे परभणीतील जनतेच्या जीवाशी खेळणे आहे. याकरिता मुख्यमंत्र्यांनी कोरोना वाढता आलेख पाहता परभणी जिल्ह्याला पूर्णवेळ आणि कार्यक्षम पालकमंत्री द्यावा, जेणेकरून प्रशासकीय पातळीवर निर्णयक्षमता मजबूत होईल आणि न्याय मिळेल, असे पत्रात म्हटले आहे. पत्राची एक प्रत प्रहार जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनाही मेलद्वारे पाठविली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button