
कोल्हापूर :- कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. त्याची प्रचिती आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे. एकेकाळी काँग्रेस (Congress) पक्षांतर्गत कट्टर राजकीय शत्रू असलेले आ. पी. एन. पाटील (P. N. Patil) आणि आ. प्रकाश आवाडे (Prakash Awade) हे जिल्हा परिषद अध्यक्षा निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत.
जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे (Rahul Awade) यांनी अध्यक्षपदासाठी पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील (Rahul Patil) यांना ताराराणी आघाडीचा पाठिंबा असल्याचे सांगत मनोमीलनाच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले. राहुल पाटील अध्यक्ष होतील किंवा नाही, हे पुढील राजकीय घडामोडींवर ठरेल; पण आवाडे यांच्या भूमिकेमुळे पी. एन. पाटील आणि प्रकाश आवाडे यांच्यातील राजकीय वैरत्व कमी होण्याची शक्यता आहे. त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. दहा वर्षांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून पी. एन.पाटील आणि प्रकाश आवाडे गट आमने- सामने आला होता. इतकेच नव्हे, तर दोन्ही गटांत हाणामारीही झाली होती.
काँग्रेसमध्ये जिल्हा काँग्रेस आणि इचलकरंजी शहर काँग्रेस अशी सरळसरळ अलिखित विभागणी झाली होती. दरम्यानच्या काळात काँग्रेस पक्षांतर्गत नेतृत्व बदल झाले आणि प्रकाश आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीमध्ये तत्कालीन आ. सतेज पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आवाडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली असली, तरी पक्षांतर्गत नेत्यांमधील दरी कमी झाली नव्हती. दरम्यान, विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसपासून फारकत घेत अपक्ष निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला; पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यानंतर जिल्ह्यातील राजकारणाची फेरमांडणी झाली.
पालकमंत्री तसेच जिल्हाध्यक्ष या नात्याने सतेज पाटील हे काँग्रेसमध्ये निर्णायक भूमिका बजावत आहेत. सद्यस्थितीत पक्षीय पातळीवर मंत्री पाटील यांची मजबूत पकड आहे. ‘गोकुळ’च्या राजकारणात मंत्री सतेज पाटील आणि पी. एन. पाटील हे आमने-सामने असले, तरी पक्षांतर्गत राजकारणात दोघांमध्ये समन्वयाची भूमिका पाहायला मिळते. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आवाडे यांनी राहुल पाटील यांना पाठिंबा जाहीर करून राजकीय गुगली टाकली आहे. यावर पालकमंत्री पाटील काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या माध्यमातून मंत्री सतेज पाटील यांचा ‘गोकुळ’ची मोर्चेबांधणी भक्कम करण्यावर भर असणार आहे.
जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीकडून (Congress-NCP) सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना राहुल पाटील हे अध्यक्षपदाचे दावेदार होते; पण काँग्रेस -राष्ट्रवादीकडे सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नव्हते. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठिंब्यासाठी आवाडे यांची मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण आवाडे यांनी आपली ताकद भाजपच्या मागे लावली. त्यामुळे राहुल पाटील यांची अध्यक्षपदाची संधी हुकली होती. आता त्याच आवाडे गटामुळे राहुल पाटील हे अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला