नामांतर, थोरात, पवार आणि सेना…

Sharad Pawar-Balasaheb Thorat-Uddhav Thackeray

Shailendra Paranjapeभारतीय जनता पक्षानं २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एक जाहिरात मोहीम सुरू केली होती. त्याआधी १५ वर्षे कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस यांचे सरकार महाराष्ट्रात १९९९ ते २०१४ अशी पंधरा वर्षे सत्तेवर होते. त्यामुळे भाजपाने `कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ अशी मोहीमच निवडणूक प्रचारादरम्यान राबवली होती. पंधरा वर्षांचा कारभार, त्यातून आलेली अँटी-इनकम्बन्सी यामुळे सर्वसामान्य जनतेमधे या प्रचारमोहिमेचा परिणामही दिसून आला होता.

त्यावेळी २०१४ च्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्ष, शिवसेना (Shivsena) आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे सामान्यपणे वर्षानुवर्षे असलेली राजकीय मतमतांतरांची विभागणीदेखील भाजपा-शिवसेना विरुद्ध कॉँग्रेस-राष्ट्रवादी अशी दिसत असे. अर्थात, सत्तेत राहूनही शिवसेनेच्या दैनिक सामना या मुखपत्रातून तत्कालीन देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवर रोजच्या रोज टीका केली जात असे. सत्तेचे सारे फायदे घेत सेनेच्या मुखपत्रातून रोज सरकारवर टीका केली जात असे आणि राजकारणात कोणीही कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात, या वाक्याचा अनुभव सध्य महाराष्ट्रात येत आहे.

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीनंतर राज्यात शिवसेना कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्या महाआघाडी सरकारची सत्ता आली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी त्यांच्या वडिलांना दिलेला शब्द पाळला आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजपा हा कालचा मित्र आता शत्रू झालेला आहे. परिणामी, भाजपा विरुद्ध बाकीचे असं नवं युद्ध राज्यामधे सुरू आहे. पण औरंगाबादच्या नामांतराच्या विषयामुळे शिवसेना विरुद्ध कॉँग्रेस असा संघर्ष बघायला मिळत आहे. या युद्धामधे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा नॉन इश्यू आहे त्यामुळे तुम्ही संभाजीनर म्हणा किंवा धाराशीव म्हणा कारण मी या विषयाकडे गांभीर्याने बघत नाही. त्यामुळेच मी यावर यापूर्वी काहीही बोललेलो नाही, असं वक्तव्य केलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar) यांना नेमकं झालंय तरी काय, अशी शंका येते. कारण चार दशकांपूर्वी विद्यापीठाच्या नामांतराबद्दल त्यांनी ठोस भूमिका घेऊन प्रसंगी सत्ता पणाला लावायलाही मागेपुढे पाहिले नव्हते. पण आज मात्र ते औरंगाबादच्या नामांराबद्दल हा नॉन इश्यू आहे किंवा फारसा गंभीर प्रश्न नाही, असं म्हणून प्रश्नालाच बगल दिलीय. तीच गोष्ट राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपांसंदर्भात आहे. मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर लगेचच शरद पवार यांनी आरोप गंभीर असल्याचं म्हटलं होतं पण नंतर त्यांनी या प्रकरणात आणखी काही माहिती पुढे आली असून मुंडे यांच्या राजीनाम्याची गरज नाही, असं विधान केलं आहे. एखाद्या प्रकरणात मुळात पुरेशी माहिती घेतल्याशिवाय शरद पवार कधीच काही बोलत नसत पण या प्रकरणात त्यांनी पहिले विधान माहिती न घेता केले होते का, असा प्रश्न निर्माण होतो. पण असं काहीही असलं तरी नामांतराबद्दल पवारसाहेबांनी त्यांच्या मनात ते शहर औरंगाबाद म्हणून हवंय की संभाजीनगर हे गुलदस्त्यातच ठेवलंय.

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी औरंगाबादच्या नामांतराचा विषय शिवसेनेने उकरून काढलाय आणि शिवसेनेला त्यांच्या मतांची चिंता वाढत असल्यानेच त्यांनी तो विषय उकरून काढलाय, अशी टीकाही केलीय. त्याबरोबरच शिवसेना आणि भाजपा पाच वर्षे सत्ते एकत्र असताना हा प्रश्न सोडवायला हवा होता, अशी टीकाही थोरात यांनी केलीय. दुसरीकडे शिवसेनेचे युवामंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी हा प्रश्न तीनही पक्ष सामंजस्याने सोडवतील, असा आशावाद व्यक्त केलाय.

त्यामुळे या प्रकरणात विविध पक्षांची मतं ही मतं मिळवण्यासाठीचीच असली तरी जनतेची मात्र फुकटात करमणूक होतेय. सरकारमधली कॉँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पक्षावरच टीका करतेय, असं चित्र दिसत असल्याने आणि राष्ट्रवादी हाताची घडी घालून गंमत बघत असल्याने कोण कोणाच्या बाजूने आहे, हे लक्षात येणे अवघडच आहे. महापालिकेची निवडणूक झाली की नामांतर मागे पडेल आणि दे लीव्ह्ड हँपिली, अँटलिस्ट फॉर नाऊ, असं म्हणत पुन्हा सुखाचा संसार सुरू होईल.

ही बातमी पण वाचा : नामांतरावरून ढोंगी राजकारण थोरतांचा शिवसेनेवर हल्लाबोल 

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER