बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर कराच!

Balasahen Thackeray & Chandrakant Khare

औरंगाबाद :- औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतर व्हावे यासाठी शिवसेना (Shivsena) प्रयत्नशील आहे. मात्र महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्यास विरोध दर्शवला आहे. तर नामांतराबाबत भाजपसह मनसेनेदेखील आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं संभाजीनगर असं नामकरण करून हिंदुत्व सिद्ध करावं, असं आव्हानच देण्यात आलं आहे. काँग्रेसने किमान समान कार्यक्रमाची आठवण करून देत नामांतराला तीव्र विरोध केला आहे.

तर, दुसरीकडं CMO अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कार्यालयाच्या ट्विटर अकाउंटद्वारे शासन निर्णय वा इतर माहिती देताना औरंगाबादचा संभाजीनगर असा उल्लेख केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आगपाखड केली होती. या सर्वावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भाष्य करत औरंगजेब हा सेक्युलर नव्हता. त्यामुळे अजेंड्याचा प्रश्न येत नाही, असं म्हणत नामकरणावर ठाम असल्याची भूमिका पुन्हा उघड केली होती. या सर्वांवर  शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khare) यांनी आनंद व्यक्त केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरबाबत ठाम भूमिका घेतल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. औरंगाबादचा संभाजीनगर असा पहिल्यांदा उल्लेख करणाऱ्या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीदिनी नामकरणावर शिक्कामोर्तब करावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली आहे. “औरंगाबादचं संभाजीनगर असं नामकरण शिवसेनाप्रमुखांनी केलं होतं. त्यामुळे त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच २३ जानेवारी रोजी ‘संभाजीनगर’ या नामकरणावर शिक्कामोर्तब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावा. यासंदर्भात मी त्यांना प्रत्यक्षदेखील भेटणार आहे.” असं खैरे म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : बॉम्बेचे मुंबई झाले मग, औरंगाबादचे संभाजीनगर का नाही? उदयनराजे कडाडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER