जगनमोहन रेड्डी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटावा

Jag Mohan Redy

नवी दिल्ली : न्यायाधीशांवर पक्षपात व वशिलेबाजीचे  बेछूट आरोप करून संपूर्ण न्यायव्यवस्थेची अप्रतिष्ठा केल्याबद्दल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना त्या पदावरून हटवावे, यासाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

रेड्डी यांनी गेल्या आठवड्यात सरन्यायाधीश न्या. शरद बोबडे यांना पाठविलेल्या ‘स्फोटक’ पत्राच्या अनुषंगाने ही याचिका जी. एस. मणी व प्रदीप कुमार यादव या दोन वकिलांनी दाखल केली आहे. याआधी रेड्डी यांच्यावर न्यायालयीन अवमाननेची (Contempt Of Court) कारवाई करावी, यासाठी एक वेगळी याचिका दाखल झाली आहे.

आंध्र प्रदेश उच्च न्यायालयातील अनेक न्यायाधीश राज्यातील तेलगु देसम हा विरोधी पक्ष व त्यांचे नेते चंद्राबाबूू नायडू याचे पाठीराखे असल्याने ते राजकीयदृष्ट्या संवेदनशील प्रकरणांमध्ये सतत सरकारच्या विरोधात निकाल देत असतात, असा आरोप रेड्डी यांनी सरन्यायाधीशांना पाठविलेल्या पत्रात केला होता. एवढेच नव्हे तर मुळचे आंध्र प्रदेशचे असलेले सर्वोच्च न्यायालयातील क्रमांक दोनचे ज्येष्ठ न्यायाधीश न्या. एन. व्ही. रमणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांवर दबाव टाकून त्यांना हवे तसे निर्णय देववून घेतात, असाही रेड्डी यांचा आरोप आहे.

आता दाखल झालेली याचिका म्हणते की, रेड्डी यांनी अशा प्रकारचे आरोप करून संपूर्ण  न्यायव्यवस्थेवरच (Judiciary) चिखलफेक केली आहे. यातून लोकांचा न्यायसंस्थेवरील विश्वास उडेल आणि तसे झाले तर संविधानाने उभा केलेला संवैधानिक ढाचाच कोसळेल.

स्वत: एका संवैधानिक पदावर (Constitutional Post) असलेल्या रड्डी यांनी दुसर्‍या संवैधानिक संस्थेवर असे जाहीर आरोप करून आपण मुख्यंमत्रीपदावर राहण्यास लायक नाही, हेच दाखवून दिले आहे, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER