ऑक्सिजन, रेमडेसिवीर फक्त ‘पॉवरफुल’ मंत्र्यांच्या जिल्ह्यातच जाते; फडणवीसांचा आरोप

Devendra Fadnavis - Maharastra Today

पालघर :- महाराष्ट्र सध्या देशातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र बनले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्राला ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शन्सचा पुरवठा करते आहे. मात्र, या मदतीचे योग्य प्रकारे वाटप होत नाही. ऑक्सिजन (Oxygen) आणि रेमडेसिवीरचा जास्तीत जास्त साठा ‘पॉवरफुल’ मंत्र्यांच्या जिल्ह्यांमध्येच जातो, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला.

ते शनिवारी (आज) पालघर जिल्ह्यातील कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. पालघरसारख्या जिल्ह्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष होते आहे. एखाद्या जिल्ह्यात किती रुग्ण, बेडस् आणि आरोग्य सुविधा आहेत याचा विचार केला जात नाही. ताकदवान नेते केंद्राकडून आलेली मदत आपापल्या जिल्ह्यांमध्ये पळवत आहेत. मंत्री हे सर्व राज्याचे असतात. त्यामुळे त्यांनी सगळे आमच्याच जिल्ह्यात आले पाहिजे, अशी मानसिकता ठेवू नये. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांतील लोकांवर अन्याय होतो, अशी खंत फडणवीस यांनी व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल 

भीती कमी केल्यास आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होईल

राज्यात कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. पहिल्या लाटेत कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीला बाधा होत असे. मात्र, आता संपूर्ण कुटुंबाच्या कुटुंब कोविडबाधित होताना दिसत आहेत. या वेळच्या लाटेत सर्व वयोगट आणि समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांना कोरोनाची लागण होताना दिसते आहे, असे फडणवीस म्हणालेत. इतक्या मोठ्या संख्येत रुग्ण वाढत असल्याने आरोग्यव्यवस्था परिस्थिती हाताळण्यात कमी पडते आहे.

या लाटेत ७० ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. त्यांच्यावर किरकोळ उपचार करून त्यांना बरे केले जाऊ शकते. मात्र, कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वजण लगेच रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. परिणामी आरोग्यव्यवस्थेवरील ताण वाढला आहे. यासाठी लोकांच्या मनातील भीती दूर केली पाहिजे. त्यामुळे आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button