राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा : शेतीला दिवसा वीज पुरवठ्याचा निर्णय

Raju Shetti - Sadabhau Khot

मुंबई : तुंडूब वाहणारी नदी, विहिरी आणि बोअरला मुबलक पाणी असूनही दिवसभर शेतात अंगमोडेपर्यंत काम करायचे तर पिकाला पाणी देण्यासाठी रात्रभर शिवारात जागायचे अशी शेतकऱ्याची अवस्था होती. शेतीला रात्रीच्या वीज पुरवठा करण्याच्या धोरणामुळे शेतकऱ्याची दगदग वाढली होती. अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आता राज्य शासनाने शेतीला दिवसा विज पुरवठा निर्णय घेतल्याने बळीराजाला कामाचे नियोजन करणे सोपे होणार आहे. राज्यातील ४२ लाख कृषीपंप धारक शेतकरी आहेत.

शेतीसाठी सौरवीज पुरवठा वगळता रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा करण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. वीज तुटवड्यावर उपाय म्हणून रात्रीच्या वेळी शेतीला विज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. दिवसभर शेतात राबल्यानंतर पाण्याच्या पाणीसाठी रात्री शिवारात ताटकळत बसावे लागत होते. सापांसह इतर प्राण्यापासून शेतकऱ्यांना धोका होता. जिल्ह्यात मुबलक पाणी असूनही वीज नसल्याने शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी ताटकळत राहण्याची वेळ शेतकऱ्यावर होती. राज्य शासनाने आता शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेतल्याने बळीराजाला दिलासा मिळणार आहे. याची ठोस अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त होत आहे. वसूलीचे प्रमाण तसेच शहरी भागाला लागून असलेल्या शेतीसाठी आठवड्यातून चार दिवस दिवसा तर इतर वेळी रात्रीचा वीज पुरवठा होता. आता दिवसभर वीज पुरवठा करण्याचा समाधानकारक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

निर्णयाचे स्वागत : शेट्टी (Raju Shetti)

शेतीला दिवसा वीज पुरवठा आणि थकबाकी माफीची आमची मागणी होती. शासनाच्या दिवसा शेतीला वीज पुरवठा करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. थकबाकी माफ करताना दंडव्याज आणि मुद्दल हे एकत्रित करु नये. दंड व्याज माफ करुन मुद्दलीमध्ये ५० टक्के सुट द्यावी. दिवसा वीज पुरवठा केल्याने शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले

शेतकऱ्यांची फसवणूक नको : सदाभाऊ (Sadabhau Khot)

संपूर्ण थकबाकीसह वीजबील माफ करण्याची गरज आहे. अनेक शेतकऱ्यांना मुळ बिलापेक्षा दंडाची रक्कम जादा लावून बिले आली आहेत. शेतकऱ्याची ही फसवणूकच आहे. प्रामाणिक वीज बिल भरलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देण्याची गरज आहे. दिवसा वीज पुरवठा निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER