नोकरदारांना दिलासा, पीएफ व्याजदरात नो चेंज !

८.५५ टक्के कायम राहणार

epf

मुंबई : देशभरातील सर्वसामान्य व भविष्याचा सर्वाधिक विचार करणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी एक मोठा दिलासा आहे. त्यांच्या पीएफवरील(भविष्य निर्वाह निधी) व्याजदरात बदल होणार नाही. तो ८.५५ टक्के कायम राहण्याचा अंदाज आहे.

इपीएफओ आपल्या सहा कोटीहून अधिक अंशधारकांसाठी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कर्मचारी भविष्य निधीवरील ८.५५ टक्के व्याज दर कायम ठेवण्याची शक्यता आहे.

व्याज दरावरील प्रस्ताव २१ फेब्रुवारीला इपीएफओ विश्वस्तांच्या बैठकीत येईल. व्याज दर २०१७-१८ प्रमाणे ८.५५ टक्के कायम ठेवला जाईल. चालू आर्थिक वर्षासाठी उत्पन्न अंदाजच मुद्दाही बैठकीत ठेवला जाईल. त्याचबरोबर लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन जमा पीएफवर ८.५५ टक्क्यांहून अधिक व्याज दिले जाण्याची शक्यताही आहे.

श्रम मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील इपीएफओची मध्यवर्ती विश्वस्त समिती (सीबीटी)आर्थिक वर्षासाठी जमा पीएफवरील व्याजदर निश्चित करते. सीबीटीकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे पाठवला जातो. अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर खातेदाराच्या अकाऊंटमध्ये व्याज जमा केले जाते.

२०१७-१८ मध्ये इपीएफओने खातेधारकांना ८.५५ टक्के व्याज दिले. जो पाच वर्षांतील सर्वांत कमी दर होता. २०१६-१७ मध्ये व्याज दर हा ८.६५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के होता. तर २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये कर्मचाऱ्यांना ८.७५ टक्के व्याज मिळाले होते. २०१२-१३ मध्ये ८.५ टक्के व्याज देण्यात आले होते.