शिथीलीकरणाच्या बैठका – भांड्याला भांडं वाजतं…

Maharashtra Today

Shailendra Paranjapeपुणे जिल्ह्यात करोनाचे (Corona) रुग्ण बरे होण्याचा दर ९४ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यातही करोना अटोक्यात येतोय. देशापातळीवर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नव्या रुग्णांपेक्षा जास्ती आहे आणि हे सलग गेले तेरा दिवस जास्ती आहे. याचा अर्थ गेले दोन आठवडे देशपातळीवर करोनास्थिती सुधारते आहे. महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या गेल्या महिनाभरात पन्नास टक्क्यांनी कमी झाली आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातला कडक लॉकडाऊन (Lockdown), सॉरी सॉरी कडक निर्बंध उठवण्याचीच गरज आहे. पण आपल्या लोकांनी निर्बंध उठवले की घोडं उधळतं तसं उधळून दाखवलंय, हा अनुभव लक्षात घेता, टप्प्याटप्प्याने ते शिथील करायला हवेत.

कडक निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथील करावेत, ही पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ(Muralidhar Mohol) यांची भूमिका आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारच्या फेसबुक संवादात (Facebook Post) त्यांची वाईटपणा घ्यायची तयारी आहे असं म्हटलंय. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रालयात या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी दोन स्वतंत्र बैठका झाल्या. एक अर्थातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली तर दुसरी उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी घेतली. तुम्हाला प्रश्न पडेल की विषय तोच, प्रयोजनही तेच मग बैठका दोन का…उत्तर एकच – भांड्याला भांड वाजतं.

मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या वेळी या विषयावर चर्चा करण्यापूर्वीची तयारी म्हणून अशा बैठका घेतल्या गेल्या. मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली ती मदत-पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याशी. उपमुख्यमंत्री अजित पवर यांनी चर्चा केली ती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि अन्न औषध प्रशासनमंत्री राजेन्द्र शिंगणे यांच्यासह अधिकाऱ्यांशी. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आला तर उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत वीस बावीस जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. पवार यांनी चार तासाहून अधिक काळ करोना स्थितीचा आणि निर्बंध शिथील केल्यास काय काय परिणाम होऊ शकतात, याचा आढावा घेतला. त्यामुळे उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यासंदर्भात चर्चा केली जाईल.

केवळ दूध, किराणा, भाजीपाला याबरोबरच नागरिकांच्या इतरही गरजा असतात आणि त्या निर्धारित करून त्यासंबंधीची दुकानं सुरू करणे, दुकांनाच्या वेळा थोड्या वाढवणे, निर्बंध शिथील करतानाच अतिउत्साह नडणार नाही ही पूर्वकाळजी घेणे, जिल्हाबंदी तशीच ठेवणे यासह विविध निर्णय होऊ शकतात. हे निर्णय घेतानाच हॉटेल्स रेस्टॉरन्ट्स पाववडा, भेळ, पाणीपुरी, शेवपाव, कच्चीदाबेली, सँडविच, कुल्फी असे सारे फिरते विक्रेते, स्टॉल्स यांनाही व्यवसायाला किमान काही काळ परवानगी द्यावी. अर्थात, लोक भेळ सकाळी उठल्याउठल्या खात नाहीत, याचे भान ठेवून निर्णय व्हावेत. त्यामुळे या व्यवसायांच्या बरकतीच्या वेळी त्यांना परवानगी दिल्यास अर्थचक्राला आणि लोकांच्या रोजीरोटीलाही मदत होईल.

दुकानांच्या बाबतीत सर्वच दुकानं सुरू करायला हवीत. वेळा स्टँगर्ड म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायांसाठी वेगवेगळे टाइम स्लॉट ठेवता येतील. त्यामुळे गर्दी टाळणे शक्य होईल आणि नागरिकांनाही वेगवेगळ्या वेळी त्या त्या वस्तू खरेदी करता येतील. गर्दीही टाळता येईल. शनिवार रविवारचे निर्बंध उठवण्याची गरज आहेच. ते उठवले जायला हवेतच.

जिममधे बंदिस्त जागेत लोक असतात पण फुटबॉलसारखा खेळ नेटच्या आत खेळताना परस्परांना स्पर्शही होत नाही, पायात बूट आणि बॉल त्यामुळे करोना पसरण्याचा धोका कसा काय उद्भवू शकतो, हे न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळे शक्याशक्यता आणि विवेकबुद्धी वापरून काही इनडोअर आणि सर्व आऊटडोअर क्रीडाप्रकार सुरू करायला परवानगी द्यायला हवी.

सलून्स बंद ठेवून काय साध्य होणार…सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सलून्स सुरू ठेवणे सहज शक्य आहे. सब घेडो बारा टके, असा विचार करणे चुकीचे आहे. हळूहळू अर्थचक्रही सुरळीत सुरू व्हायला हवे. त्यादृष्टीने या दोन्ही प्रदीर्घ महाचर्चांचा उपयोग सर्वसामान्यांना खरोखर दिलासा मिळण्यासाठी व्हावा, इतकीच इच्छा.

‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button