नातं मैत्रीचं

Friendship

मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. बहुतांश वेळा आपल्याला इतर लोकांबरोबर आणि सहकार्यानेच काम करावे लागते. नातेसंबंध हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा भाग असून जन्मतः निर्माण झालेल्या नात्यांव्यतिरिक्त काही नाती आपण नंतर जोडतो किंवा जोडली जातात त्यातीलच एक म्हणजे नातं मैत्रीचं ! मैत्री ही एक अतिशय छान , नितळ , सुंदर अशी वैश्विक कल्पना आहे .यात एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या प्रगतीसाठी, विकासासाठी मदत करणं ,परस्परांना प्रगल्भ करणं या गोष्टी येतात. तसेच मैत्री चांगली आणि वाईट अनुभवही येतात.

काही आपल्याला सुखावून जातात तर काही दुखावतातदेखील; पण त्यातूनच आपल्या मैत्रीला प्रगल्भता येत जाते. विविध क्षेत्रांतील अनेक व्यक्तींशी असणारी मैत्री आपल्याला अनेक अंगांनी प्रगल्भ करत जाते . कारण त्यानिमित्ताने अनेक विषयांची माहिती मिळते , दृष्टिकोन बदलतात आणि आयुष्य घडू शकतं किंवा बिघडू शकतं. म्हणूनच या नात्याचा होणारा परिणाम जाणून घेऊन, बिघडण्याला फाटा देऊन आयुष्य घडू कसे शकेल हे बघायला लागतं. याच मैत्रीमध्ये हा मित्र काय म्हणेल ? ती मैत्रीण काय म्हणेल ? या प्रभावामुळे ठामपणे नाही म्हणायला जमत नाही. आणि त्यामुळे अशी मैत्री चुकीच्या दिशेने नेऊ शकते आणि बिघडण्याचे स्वरूप मिळू शकते. असे जरी असले तरीही या मैत्रीचे खूप सारे फायदे पण आहेत. शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना असे त्रिकूट किंवा चौकड्या प्रसिद्ध असतातच.

यांचा परस्परांवर परिणाम होत असतो. त्यातून काही व्यसनांची सवयही लागू शकते. पण बरेचदा विविध गुणांचा संगम झालेला जर ग्रुप एकत्र आला तर त्यांना परस्पराकडून बऱ्याच गोष्टी शिकता येतात आणि स्वतःमध्ये सवयी लावून घेता येतात. अशीच एक छात्र प्रबोधन मासिकामध्ये आलेली डॉ. अनघाताई लवळेकर यांची एक कथा वाचली होती. त्यात अशीच एक चौकडी दाखवली आहे. एका शाळेच्या मासिकासाठी त्या चौकडीची मुलाखत, मैत्री या सदराखाली लिहिण्यासाठी, ती घ्यायला त्यांचा एक मित्र येतो आणि नंतर त्यांची चौकडी आवडून तो त्याच ग्रुपचाच एक सदस्य बनून जातो. आणि मग मुलाखत घेता घेता, त्या चौकडीच्या मैत्रीविषयी आपल्यालाही बरंच काही कळत जातं.

खरं तर ते चौघे जण वेगवेगळ्या स्वभावाचे, आवडीनिवडीचे असतात. पण चुंबकीय तत्त्वांच्या फिजिक्सच्या नियमाप्रमाणे ते एकमेकांकडे ओढले जातात. त्यांच्यापैकी कोणी सुंदर लिहिणारा, बोलणारा, समजावून सांगणारा असतो, तर कोणी उत्तम व्यवस्थापक असतो, कुणामध्ये स्टेज डेअरिंग जास्त असते. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते प्रत्येक जण एकमेकांकडून गुण घेण्याचा परिणाम करतात. तसेच त्यांच्यात काही दोषही असतात. ते अतिशय सहजतेने घेतले जातात. त्याला फार मोठे केल्या जात नाही. मुख्य म्हणजे चौघांपैकी दोन मुले, दोन मुली असा तो ग्रुप असतो, तोही टीनेजर्सचा. पण त्यातली एक जण म्हणते, “त्यासाठी आधी मुलं आणि मुली वगैरे डोक्यात असेल तरच ना ! आम्ही एकमेकांचे मस्त दोस्त आहोत.

हे मुलगा-मुलगी पण वगैरे यात काही येत नाही. हा ! एकमेकांना समजून घेण्यासाठी, मदत करण्यासाठी, शेअर करण्यासाठी ,लागेल तेवढं तर आम्हीच जाणून घेतोच; पण त्याला उगीच फाटे फोडत बसत नाही किंवा वेगळा अर्थही काढत नाही . सगळ्या गोष्टी मिळून करायच्या, शिकायचं , माणूस म्हणूनही मोठं व्हायचं , मैत्रीतून नुसते हट्ट पुरवायचे नाहीत हे आम्ही ठरवले आहे. इतरांनी काय अर्थ काढावेत हा त्यांचा प्रश्न आहे. आमच्यात असलं पॅचअपही नाही आणि ब्रेकअपही नाही ! या छोट्याशा गोष्टीतून अतिशय सुंदर पद्धतीने अनघाताईंनी पौगंडावस्थेतील मैत्री संबंधित उद्बोधन केलेले आहे. हे मैत्रीचं नातं बिघडवणारं पण होऊ शकतं.

या तरुण वयामध्ये माझे मित्र आणि मैत्रिणी असाव्यात असं वाटत असतं, ही मैत्री तुटू नाही. नाते टिकवायला हवं, असंसुद्धा वाटत असतं आणि त्यातूनच मग त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असते. त्यासाठी कोणतीही किंमत मोजू नये हे समजण्याचे भान बरेचदा राहात नाही. मग मैत्रीखातर दारू पिऊन बघायला काय हरकत आहे ? थोड्याशा तंबाखू आणि गुटखा आणि काय होते ? कित्येक सिनेमातले हिरो सिगारेटचा झुरका मारताना दिसतात तेही करून बघायला हवे. मुलींवर स्टाईल मारायला हवी असलं सगळं डोक्यात असतं. परंतु हे सगळं करत असताना सारासार विचार करत करणारे आपले मित्र आहेत का याचा अनुभव यायला हवा आणि थोडा जास्त वेळ झाल्यावर गप्पा मारणे इथपर्यंत ठीक आहे; पण पैसे उधळणं ,अभ्यास न करणं , व्यसनाधीनता असे तर होत नाही ना? यामध्ये तर आपण वाहवून जात नाही ना? हे शोधणे खूप गरजेचे असते. म्हणूनच या वयातल्या मैत्रीकडे बघण्याचा डोळसपणा राखता यायला पाहिजे. दारूच्या व्यसनाच्या आजाराप्रमाणे, “मी प्रमाणात सेवन करतो.

त्यामुळे माझी मर्यादा पाळत असल्याने मी कधीच व्यसनी होणार नाही .” हा समजच मुळी फसवणारा आहे. त्यामुळे मैत्री असणं आवश्यक आहे. तितकीच ती डोळस असणंही खूप गरजेचे आहे. एक छोटीशी गोष्ट आहे . एक तरुण छोट्या गावातून मोठ्या शहरात कामाच्या शोधासाठी येतो. तो मिळेल ते काम करत ,कष्ट करत ,काही वर्षांनी तो स्वतःचा खोदकामाचा व्यवसाय सुरू करतो .त्या व्यवसायात त्याला भरपूर यश मिळते. त्याच्या हाताखाली खूप कुशल लोक काम करत असतात. त्याचे सहकारीदेखील अत्यंत हुशार आणि गुणी असतात. जेव्हा इतर लोक त्याला विचारायचे की, “तुमच्या कार्यपद्धतीमध्ये असे काय विशेष आहे की ज्याने इतके कुशल लोक तुम्हाला सहकारी म्हणून लाभले?” तेव्हा अगदी सोप्या भाषेत त्यांनी उत्तर दिले की , “माणसे पारखणे आणि जपणे खोदकाम करून सोने शोधण्यासारखे आहे . खूप माती काढून गाळून गाळून त्यातून सोने शोधावे लागते , तसेच माणसांचे आहे.

कुशल गुणी माणसे सहजासहजी मिळत नाहीत . त्यासाठी पारखी नजर लागते. आणि मग अनेक बऱ्यावाईट माणसांमधून आपण विश्वासू कुशल आणि गुणी माणसे ओळखून बाजूला काढू शकतो !” मित्र शोधतानाही आपण हेच पथ्य पाळायला पाहिजे. तेव्हा ते मोरपंखी नातं मैत्रीचं आपल्याला मिळू शकते. मोरपंखात परस्परांमध्ये मिसळत जाणाऱ्या चार शेड्स असतात. आणि त्यात आणखीन एक आपली शेड आपण मिसळू शकतो.

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER