“नात्यांच्या जपणुकीसाठी — ‘ स्पेस ‘आवश्यक !”

Relationships need space

फ्रेंड्स! मानसशास्त्राच्या चष्म्यातून, घराघरातून डोकावून बघितलं तर दररोज एक कथा जन्म घेत राहते. अर्थात याचे उत्तर तेच ! जेथे व्यक्ती आहे, माणूस आहे, मन आहे, तेथे मानसशास्त्राशी नाते आहेच .

असंच एक कुटुंब. आनंदी कुटुंब. घरात आजी -आजोबा, मुलगा -सून, नातवंड. आजोबा निवृत्त झालेले ! मुलगा सून दोघेही चांगल्या पदावर नोकरीला. पगार छान. आजोबांचे ही निवृत्ती वेतन, आजी आजोबा दोघांच्याही तब्येती छान! त्यांची एक मुलगी अमेरिकेत स्थायिक झालेली. जावई पण मनासारखा ! नातवंडांना आजी-आजोबांचा लळा. एखादे कुटुंब “सुखी कुटुंब” असण्यासाठी यापेक्षा आणखीन काय हवे !

आणि एक दिवस समजलं की मुलगा आणि सुनेने अगदी किरकोळ, क्षुल्लक वादातून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आजूबाजूच्या, शेजाऱ्यापाजार्याना खूपच आश्चर्य वाटते आहे. सगळं काही’ ‘गुडीगुडी’ चाललेलं. कधीही घरातून वादविवादाचे सूरही ऐकू आले नाही, आणि एकदम टोकाचे सूर ?

फ्रेंड्स ! होतं असंही कधी कधी ! बरेचदा घराघरातून होणाऱ्या युद्धाची जाणीव कोणाला होत नाही. पण “शीतयुद्ध “म्हणतात ना ? (कोल्ड वार )तसेच सुरू असतं, आणि मग एखादी क्षुल्लक ठिणगी ही वणवा पेटवू शकते. विशेषतः सुशिक्षित घरांमधून असे सूर घराबाहेर न पडू देण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. भांड्याला भांड सगळीकडेच लागते, पण आवाज होऊ नये म्हणून आपण पटकन हात लावून भांड्याचा आवाज थांबवतो ना?, अगदी तसंच. घरोघरी मातीच्या चुली, आज-काल गॅस किंवा अगदी आत्ताची पिढी मायक्रोवेव्ह आणि इंडक्शन पण आणेनात. मुळातील म्हणी मध्ये फरक पडत नाही. कारण जिवंत व्यक्ती तीच आहे. तिचे मन, भावना, अपेक्षा, गरजा मानसिक भावनिक सगळ्या त्याच आहेत. त्यामुळे फरक कसा पडणार ?फक्त सुशिक्षित पणाची झूल पांघरलेल्यामुळे सगळ्या भावना दाबून ठेवण्यावर भर दिला जातो. आलन बेक च्या “कॉग्नेटिवे ट्रायड” सारख्या स्वतः विषयक, जगा विषयक, आयुष्य विषयक चुकीच्या कल्पना, विचार यासारख्या गोष्टींमधून परस्पर संबंधांवर आधारित गोष्टी केवळ व्यक्त न केल्यामुळे धुमसत राहतात. कारण मुळातच जग काय म्हणेल ? संघर्ष केवळ चार भिंती ठेवण्याची किंवा सहन करण्याची, समजुतीने घेण्याची, भावना व संस्कार असतात.

मला असं म्हणायचं नाही आहे की सहन करणे किंवा समजुतीने घेणे अयोग्य आहे ! त्या चांगल्या गोष्टी आहेतच ! पण जर याला कुठेही वाट सापडली नाही, तर या सगळ्या भावना प्रेशर कूकरचा जसा स्फोट होतो ना, त्याप्रमाणे स्फोट होऊन बाहेर पडू शकतात.

आणि मग त्याला शुल्लक कारणही पुरतं! सर्वसाधारणपणे वर वर्णन केलेल्या कुटुंबांचा पण विचार केला तर आर्थिक प्रश्न नाही ! म्हणजे आजी-आजोबा आर्थिक दृष्ट्या संपन्न व तब्येतीने व्यवस्थित !

त्यामुळे त्यांचा” गृहस्थाश्रम “त्यांनी सोडलेला नसणार. सगळ्या बाबतीत निर्णय घेणे, दैनंदिन गोष्टी बारीक-सारीक ठरवणे, मुलांना कसं वाढवायचं याविषयी त्यांची आग्रही मत असू शकतात.

मुलगा सुन नोकरी करणार, त्यामुळे नातवंडांना सांभाळत असल्याने खटकणाऱ्या गोष्टींकडे त्यांनी आत्तापर्यंत डोळेझाक केलेली असणार. बरेचदा सुनेच्या मनातला राग, तिरस्कार, अप्रत्यक्ष केलेला अपमान आजी-आजोबा सहनही करत असतील.

मुख्य म्हणजे ब-याच कुटुंबांमधून मोठी समस्या म्हणजे अजिबात संवाद नसतो. असला तरी अगदी जुजबी. कारण वाद होण्यापेक्षा न बोललेलं बरं हा उद्देश!

याला कारण म्हणजे “स्पेस !”बरीच वर्षे एकत्र घालवून इतक्या गोष्टींच्या निरगाठी, आकस, राग मनात साठत जातो की त्या नव्याने सोडवणे अवघड होऊन बसते. बरे संवाद होऊनही उपयोग नसतो. कारण प्रत्येक जण आता “एक पूर्ण स्वतंत्र व्यक्तिमत्त्व” असतं. प्रत्येकाची मतं आणि आवडीनिवडी असतात. यातच बदलाची अपेक्षा सर्वसाधारणपणे तरुण पिढी कडून असते. ते काही अंशी बरोबरही आहे, कारण वयाच्या या हिशोबाने रिजिड मते वडील मंडळींचे असणार हे गृहीत धरले जाते. आणि मग तरुण पिढी वर ताण येतो. त्यामुळे बहुतेक कुटुंबातून”तुझं माझं जमेना आणि तुझ्या विना करमेना !”अशी परिस्थिती दिसते.

असे हे ताणा चे धनुष्य फार ताणले तर तुटतेच ! आपल्याकडे मुळातच वेगळे होणे या गोष्टीकडे फार विचित्र नजरेने बघितले जाते. वेगळे होण्यासाठी प्रचंड वैर होई पर्यंत वाट का बघायची ? हेच मुळी कळत नाही. त्यात बहुतांश लोक अशा वेळी तरुण पिढीकडे गुन्हेगार या नजरेने बघतात ! बिचाऱ्या माय बापाला एकट टाकलं म्हणून! पण परिस्थिती एकांगी कधीच नसते आणि कौटुंबिक बाबतीत काय करायचं हा खरं म्हणजे प्रत्येकाचा वैयक्तिक विषय असतो. पण तो पूर्वग्रहदूषित नजरेने चर्चिल्या जातो आणि गॉसिपिंगला एक नवा विषय मिळतो.

ही बातमी पण वाचा : “करिअर की घर ? समतोल साधतांना !”

आजकाल आयुर्मर्यादा वाढली आहे. सत्तर पंच्याहत्तर पर्यंत वृद्ध समजले जात नाही .परंतु नवीन पिढीला ही स्वतंत्र स्वतःची “स्पेस” हवी असते. मदतीचा हातही काही मर्यादेपर्यंत ठीक वाटतो .नंतर त्यामुळे स्वातंत्र्यावर अडथळा येतो .स्वतंत्र निर्णय घेणे, स्वतःचे घर सजवणे, स्वतःचा संसार करणे, जबाबदाऱ्या स्वीकारणे, आवडत असतं. भलेही बरेचदा चुका होतील पण स्वतःच्या बळावर केलेल्या संसाराचा आनंद वेगळा असतो. याला आपण स्वावलंबीत्व असेही असे म्हणू शकतो. बरेचदा मोठी पिढी लहानांना पंगू तर बनवून ठेवत नाही ना? असा प्रश्न पडतो. बरेचदा अशा वेळी लहान लहान म्हणून राहून “आत्मविश्वास हरवतो.” असेही दिसून येते.

वेगळे होण्यामागे नाते तोडायला निघालेले असणे, आपलं वृद्धापकाळात काही करायलाच नको, आपली ढवळाढवळ नको, म्हणजे आपण नाकारले गेलो आहोत, आमची आता गरज उरली नाही, अडचण होऊ लागली, यामुळे दुखावले जाणे, तुटलेपण जाणवणे, एकाकी वाटणे यासारखा टोकाचा आणि अविवेकी विचार करण्याची खरंतर अजिबात गरज नसते. आमचा मुलगा आणि नातवंड आमच्यापासून तोडली वगैरेची तर त्याहून गरज नसते. दूर राहूनही चांगले संबंध राखता येतात, मदतीला धावून येता येते, काळजी घेता येते.

यामध्ये वृद्धांच्या दृष्टीनेही एक पैलू असतो तो म्हणजे त्यांच्या जगण्याला मुळात धेय्य उरलेलं नसतं आणि त्यामुळे ते त्यातच गुरफटत जातात हे त्यांच्या लक्षात येतं.

खरतर एका विशिष्ट वयानंतर जबाबदारी पूर्णांशाने मुलगा सुनेकडे सोपवणे व दुरून आनंदात तो संसार बघणे ही किती आनंदाची गोष्ट आहे आणि अशी समजूतदार नाती असतील तर कुठलीही नवीन पिढी सल्ला मार्गदर्शन घ्यायला आपोआप येतात. त्यांना घरात एक श्रद्धास्थान हवं असतं खऱ्या अर्थाने ! सवयीने सूनही अगदी” भात किती लावू ?” हे विचारायला येऊ शकते. पण ती वेळच कदाचित तिच्यावर येत नाही.

म्हणून वरच्या उदाहरण या सारखी परिस्थिती येऊन ठेपते .त्यात असामान्य काही नाही. कुठलाही पूर्वग्रह न बाळगता, जुने राग, अपमान याबाबत राग न धरता त्यांना मोठ्या मनाने माफ करून एकत्र बसून चर्चा करावी. आपल्याला किती तुटलेपणा वाटतोय यासारख्या आपल्या भावना नवीन पिढीपर्यंत पोहोचवाव्या.आणि त्यापूर्वी असा निर्णय घेण्यामागचे कारण अगदी मोकळेपणाने विचारावे. त्यांना” स्पेस” द्यावी ! थोडे मागे सरकावे !आणि त्यातूनही पुढे नाहीच जमलं ,तर खेळकरपणे राहू द्या ना त्यांना वेगळे खुशाल !

ही” स्पेस” ही प्रत्येकच नात्याची खरं म्हणजे गरज आहे. नवरा बायको ,तरुण मुले मुली व आई-वडील ! नाहीतर नात ताणले जाण्याची शक्यता असते.

मानसी गिरीश फडके.
समुपदेशक व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER