रेखा जरे हत्या : आरोपी बोठेच्या अटकेसाठी पुत्र कुटुंबासोबत करणार ५ मार्चपासून आमरण उपोषण

Rekha Jare

अहमदनगर : अहमदनगर येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अजून अटक झालेली नाही. बोठेला त्वरित अटक करा, या मागणीसाठी रेखा यांचे  पुत्र रुणाल ५ मार्चपासून सहकुटुंब आमरण उपोषण करणार आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबरला  हत्या  झाली आहे. तीन महिन्यांनंतरही मुख्य सूत्रधार बाळ बोठे फरार आहे. बाळ बोठे याला राजकीय किंवा शासकीय यंत्रणा पाठीशी घालत असल्याचा आरोप रुणाल याने केला आहे. बाळ बोठेला अटक होत नाही तोपर्यंत सहकुटुंब आमरण उपोषण करेन, असे रुणाल याने सांगितले.

बाळ बोठे विरोधात ‘स्टॅण्डिंग वॉरंट’

रेखा जरे यांच्या हत्याकांडप्रकरणात बाळ बोठे हाच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले. बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर येथील न्यायालयाने  ‘स्टॅण्डिंग वॉरंट’  काढले आहे. बोठे याने जिल्हा सत्र न्यायालयात अटक टाळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी हा अर्ज फेटाळला. त्यामुळे बाळ बोठे याच्याविरोधात पुढील कारवाई करण्याचा पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर २०२० रोजी नगर-पुणे महामार्गावर सुपे येथील घाटात धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हा गुन्हा बोठे याच्या सांगण्यावरून केल्याची कबुली दिली आहे. या हत्याकांडात नाव आल्यापासून आरोपी बोठे फरार आहे. जिल्हा न्यायालयासह मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानेही बोठे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

न्यायालयात

या प्रकरणी २२ फेब्रुवारीला पारनेर न्यायालयात सुनावणी झाली. बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्या विरोधात  स्टॅण्डिंग वॉरंट काढण्यासाठी पारनेर येथील न्यायालयात अर्ज केला होता. पोलिसांचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. आता आपल्याला फरार घोषित करण्यात येऊ शकते याची कल्पना आल्याने बोठे याने  स्टॅण्डिंग वॉरंट ऑर्डरच्या विरोधात जिल्हा आणि सत्र न्यायालयात आव्हान देत अर्ज दाखल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER