राज्यातील कनिष्ठ न्यायालयांमध्ये सोमवारपासून नियमित सुनावणी

Court

मुंबई: महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमधील जिल्हा न्यायालयापर्यंतच्या सर्व कनिष्ठ न्यायालयांमध्ये येत्या सोमवार १ फेब्रुवारीपासून प्रकरणांची प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचे काम पुन्हा सुरु होणार आहे. म्हणजेच कोरोनामुळे गेल्या मार्चमध्ये ‘लॉकडाऊन’ (Lockdown)लागू होण्यापूर्वी जसे कामकाज चाले तसे कामकाज या न्यायालयांमध्ये सुमारे १० महिन्यांनंतर पुन्हा सुरु होईल.

मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय न्यायाधीशांच्या (Administrative Judges) समितीने घेतलेला हा निर्णय न्यायालयाच्या महाप्रबंधकांनी शुक्रवारी नोटिशीव्दारे सर्व संबंधितांना कळविला. राज्यातील प्रत्येक न्यायिक जिल्ह्यातील न्यायिक प्रशासनाची जबाबदारी उच्च न्यायालयातील एकेका न्यायाधीशाकडे दिलेली असते. त्यांना प्रशासकीय न्यायाधीश असे म्हटले जाते. न्यायालयांमध्ये पुन्हा प्रत्यक्ष सुनावणीचे कामकाज सुरु करताना सरकारनेठरवून दिलेल्या सर्व नियमांचे कसोशीने पालन करावे, असेही त्यांना कळविण्यात आले आहे. हा निर्णय या दोन्ही राज्यांतील तालुका व शहर पातळीवरील सर्व दंडाधिकारी न्यायालये, सत्र न्यायालये, दिवाणी न्यायालये, श्रम न्यायालय, औद्योगिक न्यायालये व सहकारी न्यायालयांना लागू होईल. तसेच महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यांखेरीज दादरा आणि नगरहवेली तसेच दमण व दिव येथील न्यायालयांनाही लागू होईल.

‘लॉकडाऊन’ लागू झाल्यानंतर सुरुवातीस या सर्व न्यायालयांमध्ये सर्व कामकाज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. कालांतराने तेथे फक्त तातडीच्या प्रकरणांची सुनावणी सुरु करण्यात आली होती. खुद्द उच्च न्यायालयात मात्र अद्याप प्रत्यक्ष सुनावणीचे काम पूर्णांशाने सुरु झालेले नाही.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER