अमरावती जिल्ह्यातील १५६ गावांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्री पेयजल योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश

Gulabrao Patil

मुंबई : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने अंमलबजावणी सुरू असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कामांचा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. 156 गावे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या बळकटीकरणाचे काम मुख्यमंत्री पेयजल योजनेत समाविष्ट करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

156 गावे पाणीपुरवठा योजना 20 वर्षाहून अधिक जुनी झालेली मोठी योजना आहे. यामधील 10 गावांना यापूर्वी गुरुत्व पद्धतीने पाणीपुरवठा होत होता. मात्र तो अपुरा पडू लागल्यामुळे नवीन टाक्या बांधण्याचे आणि 12 गावांमध्ये वितरण व्यवस्था टाकण्याचे काम हाती घेण्यात यावे. तसेच ही योजना खारपाण पट्ट्यात असल्यामुळे योजनेचे बळकटीकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी योजनेचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेत करण्यात यावा, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

105 गावे योजना नवीन जलजीवन मिशनमध्ये घेण्यात यावी तसेच 40 लिटरऐवजी 55 लिटर प्रतिमाणसी या क्षमतेची करण्यासह पुढील 30 वर्षाचे नियोजन करुन योजनेचा आराखडा तात्काळ तयार करावा, त्यास मान्यता दिली जाईल. 70 गावे पाणीपुरवठा योजनेचा देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च आणि वसुली तसेच योजना चालविण्यातील खर्चाची तफावत पाहता ग्रामविकास विभागासोबत बैठक घेऊन त्यातील अडचणी दूर करण्यात याव्यात, असेही मंत्री श्री. पाटील आणि श्रीमती ठाकूर यांनी स्पष्ट केले. यावेळी अमरावती पाणीपुरवठा योजनेचाही आढावा घेण्यात आला.

बैठकीस आमदार सर्वश्री प्रविण पोटे-पाटील, बळवंत वानखडे, प्रताप अडसड, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे (म.जि.प्रा.)सदस्य सचिव अभय महाजन, अमरावती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव चंद्रकांत गजभिये, म.जि.प्रा.चे अधीक्षक अभियंता पी. डी. भामरे आदी उपस्थित होते.