कोरोना रुग्णांची ओळख स्पष्ट करणारी पोस्टर लावण्यास मनाई

केंद्राच्या खुलाशानंतर सुप्रीम कोर्टाचा आदेश

COVID -19 Poster - Supreme Court

नवी दिल्ली : कोरोनाची (Corona) लागण झालेल्या रुग्णांची ओळख आणि ठावठिकाणा ज्यातून स्पष्ट होईल अशी कोणताही पोस्टर, आपत्ती  निवारण कायद्याखालील सक्षम प्राधिकार्‍यांच्या निर्देशांखेरीज कोणत्याही घराच्या अथवा इमारतीच्या बाहेर लावली जाऊ नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी दिले.

ज्या कोरोना रुग्णांना घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे त्यांच्या इमारतींच्या बाहेर अशी पोस्टर अनेक राज्यांमध्ये लावली जात आहेत. त्या पोस्टरवर विलगीकरणात ठेवलेल्या व्यक्तिंची संख्या, विलगीकरणाचा कालावधी लिहिलेला असतो व बाहेरच्या कोणाही व्यक्तीने त्या घरात किंवा इमारतीत प्रवेश करू नये, अशी इशारावजा सूचना लिहिलेली असते. याला आव्हान देणाºया जनहित याचिका करण्यात आल्या होत्या. त्यावर केंद्र सरकारने, आम्ही यासंदर्भात याआधीच राज्य सरकारांना मार्गदर्शिका पाठविल्या आहेत, असे सांगितले होते. केंद्राच्या त्या मार्गदर्शिकेचे राज्यांनी पालन करावे, असे निर्देश देऊन न्या. अशोक भूषण, न्या. भूषण गवई व न्या. एम. आर. शहा यांच्या खंडपीठाने याचिका निकाली काढल्या.

सुनावणीच्या वेळी न्यायालयाने, अशी पोस्टर  लावणे चुकीचे असल्याचे सूचित करताना म्हटले होते की, असे केल्याने कोरोनाचा संसर्ग झालेल्यांवर एक प्रकारे ‘कलंक’ लावल्यासारख होते व त्यातून या लोकांना ‘बहिष्कृत’ केली जाण्याची शक्यताही निर्माण होते.

कोर्टाच्या प्रश्नांना उत्तर देताना सॉलिसिटर जनर तुषार मेहता म्हणाले होते की, निव्वळ पोस्टर लावणे आक्षेपार्ह मानण्याचे कारण नाही. त्यामगजा होतू काय आहे हे लक्षात घ्यायला हवा. कोरानाचा संसर्ग झालेल्यांची समाजात मानखंडना होईल, असा मजकूर असेल तर अशी पोस्टर लावणे टाळायला हवे. पण बाहेरच्या लोकांनी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात अनवधानानेही येऊ नये या उद्देशाने पोस्टर लावायची असतील तर ती कशी व कोणत्या भाशेत लावावीत हे राज्य सरकारांनी ठरवायला हवे.

एखाद्या आजारपणामुळे व्यक्तीला वेगळी वागणुूक देणे हा संविधानाने निषिद्ध ठरविलेली भेदभाव आहे. अशा  प्रकारची  माहिती प्रसिद्ध करणे हे संबंधित व्यक्तीच्या सन्मानाने जगण्याच्या हक्काला मारक ठरणारे आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER