
बीजिंग : तायवान चीनमध्ये विलीनीकरणास तयार न झाल्यास तायवानवर हल्ला करू, अशी धमकी चीनने दिली. चीनच्या सेंट्रल मिलिटरी कमिशनचे सदस्य आणि जॉइंट स्टाफ डिपार्टमेंटचे प्रमुख ली झुओचेंग म्हणाले की, तायवानाला स्वतंत्र होण्यापासून रोखण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यास चीन त्याच्यावर हल्ला करेल. ली झुओचेंग हे चीनच्या वरिष्ठ जनरलपैकी एक आहेत. झुओचेंग म्हणाले की, तायवान शांततेने विलीनीकरणास तयार झाला नाही तर चीन सर्व नागरिकांना सोबत घेऊन फुटीरतावाद्यांवर कारवाई करेल.
आम्ही सुरक्षा दलाचा वापर करणार नाही, असे वचन देत नाही. तायवानमध्ये स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आम्ही हा पर्याय राखून ठेवला आहे.चीनच्या अँटी-ससेन्शन कायद्याला १५ वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात झुओचेंग बोलत होते. हा कायदा चीनला अधिकार देतो की – तायवानने वेगळे होण्याचा प्रयत्न केला तर सैन्य त्याच्यावर कारवाई करू शकते. या संदर्भात उल्लेखनीय आहे की, मागील अनेक वर्षांपासून चीन, तायवान हा चीनचा भाग असल्याचा दावा करतो. मात्र तायवान स्वतःला सार्वभौम लोकतांत्रिक देश मानते. चीनच्या विरोधामुळे तायवानला देशपातळीवरच्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये स्थान मिळू शकलेले नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला