आध्यात्मिक ‘लीव्ह-इन पार्टनर’ला ‘गुरु’च्या हवाली करण्यास नकार

Kerala Hc
  • ‘बाबा’च्या याचिकेवर केरळ हायकोर्टाचा ‘हटके’ निकाल

एर्णाकुलम : २१ वर्षे  वयाच्या माझ्या ‘आध्यात्मिक लीव्ह-इन पार्टनर’ला तिच्या आई-वडिलांनी जबरदस्तीने डांबून ठेवले आहे. तरी तिला त्यांच्या तावडीतून सोडवून माझ्याकडे सुपूर्द करावी, अशी मुलखावेगळी मागणी करणारी एका ‘आध्यात्मिक गुरु’ची याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

स्वत:ला आध्यात्मिक गुरु आणि योग शिक्षक म्हणविणार्‍या डॉ. कैलास नटराजन नावाच्या ५२ वर्षाच्या व्यक्तीने ही ‘हेबियस कॉर्प्स’ याचिका केली होती. न्या. के. विनोद चंद्रन आणि न्या. श्रीमती एम. आर. अनिता यांच्या खंडपीठाने ती फेटाळली. या निकालास ‘जरा हटके’ असा निकाल म्हणावे लागेल. कारण न्यायमूर्तींनी विचारले तेव्हा त्या २१ वर्षाच्या मुलीने, ’मला घरी राहायचे नाही. मला माझ्या गुरुंसोबतच राहायचे आहे’, अस त्यांना ठापमणे सांगितले होते. सर्वसाधारणपणे जेव्हा अशी व्यक्ती सज्ञान असते तेव्हा न्यायालय तिच्या इच्छेविरुद्ध निकाल देता नाही. पण या प्रकरणात तसा तो दिला गेला हेच त्याचे वेगळेपण.

‘बाबां’ची तिच्या या शिष्येची इच्छा अमान्य करण्याचे कारण देताना न्यायमूर्तींनी नमूद केले की, आम्ही त्या मुलीची खासगीत बोललो. तिची मानसिक स्थिती ठीक नाही व ती आपला आपण योग्य निर्णय घेण्याच्या अवस्थेत नाही, असे आम्हाला तिच्या वागण्या-बोलण्यावरून वाटते. अशा स्थितीत आई-वडिलचे तिची योग्य काळजी घेऊ शकतात, अशी आम्हाला खात्री आहे.
न्यायालयाने म्हटले की, संबंधित व्यक्तीला कोणाच्या ताब्यात द्यावे (ठेवावे) हे ठरविण्याचा विशेषाधिकार न्यायालये दोन पालकांमध्ये मुलांच्या ताब्यावरून सुरु असलेल्या वादाच्या प्रकरणात वापरत असतात. पण असामान्य परिस्थिती असेल तर हा अधिकार इतर प्ररकणांतही वापरता येऊ शकतो. आमच्या पुढचे प्रकरण हे असेच असाधारण असल्याने आम्ही तोच अधिकार वापरून याचिकाकर्त्याची मागणी अमान्य करत आहोत.

खंडपीठाने असेही नमूद केले की, ही मुलगी अंगावर भगवी वस्त्रे व कपाळावर आणि भांगात ‘सिंदूर’ अशा अवस्थेत आमच्यासमोर आली होती. आम्ही तिला मनोविकार तज्ज्ञाकडे जाण्याचाही सल्ला दिला. पण तिने त्यास साफ नकार दिला.
या मुलीच्या आई-वडिलांनी असे सांगितले की, मुलगी विचित्र वागते म्हणून लोकांचे ऐकून आम्हीच ‘उपचार’ करण्यासाठी तिला या ‘बाबां’कडे घेऊन गेलो. ते बाबा ‘तिला एकांतात घेऊनच उपचार करावे लागतील’, असे सांगत. मुलगी बरी होईल या वेड्या आशेने आम्ही तयार झालो. पण बाबांनी तिच्यावर काय मोहिनी घातली नकळे, मुलगी त्यांना सोडून घरी यायलाच तयार होईनाशी झाली.

न्यायालयाने या ‘बाबा’ची पूर्वपीठिका तपासायला पोलिसांना सांगितले होते. त्यांनी कळविले की, या ‘बाबा’चा फार मोठा अनुयायी वर्ग असल्याचे दिसले नाही. शिवाय या ‘बाबा’ला कोणताही सिद्धी प्राप्त झाल्याचेही पुरावे नाहीत. या बाबाला पत्नी व दोन मुले आहेत. पण त्यांना वार्‍यावर सोडून हा ‘बाबागिरी’ करतो आहे, असेही पोलिसांनी कळविले. या सर्वाचा संदर्भ देत खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्त्याची पार्श्वभूमी पाहता केवळ तो या मुलीला आध्यात्मिक शिक्षण देत असल्याचे सांगतो यावर विश्वास ठेवून तिला त्याच्याकडे पाठविणे आम्हाला योग्य वाटत नाही. या मुलीचे आई-वडील तिला ज्या विश्वासाने त्याच्याकडे घेऊन गेले होते त्या विश्वासाला त्याने तडा दिला. एवढेच नव्हे तर  सुरुवातीस ही मुलगी आपली शिष्या आहे असे म्हणण्यापासून आता तिला स्वत:ची ‘लीव्ह-इन पार्टनर’ म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.

अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER