‘महानिर्मिती’ची सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी वीज निर्मिती

Electricity

मुंबई : महाराष्ट्र राज्याची अग्रगण्य वीजनिर्मिती ‘महानिर्मिती’ने आज (९ मार्च ) रोजी दुपारी ४.४० वाजता एकूण १०, ४४५ मेगावॅट वीजनिर्मिती करून औष्णिक वीजनिर्मितीमध्ये ६० वर्षातील सर्वोच्च वीजनिर्मितीचा हा नवा उच्चांक गाठला.

स्वतःचाच विक्रम मोडला

७ मार्चपासून निर्मितीक्षमता वाढवत महानिर्मितीच्या यापूर्वीचा २० मे २०१९ चा १००९८ मेगावॅटचा उच्चांक मोडून आधी १०२७५ मेगावॅट वीजनिर्मिती केली, त्यात सातत्य राखत आता आज दुपारी ४. ४० वाजता स्वतःचाच विक्रम मोडून १०४४५ मेगावॅट वीजनिर्मितीची ऐतिहासिक कामगिरी केली.

यात औष्णिक वीज ७९९१ मेगावॅट, पवन ऊर्जा २६४ मेगावॅट तर जल विद्युत २१३८ मेगावॅट आणि सौरऊर्जा ५० मेगावॅट निर्मिती आहे. या वेळी महावितरणची विजेची मागणी २२१२९ मेगावॅट होती तसेच राज्याची एकूण वीजनिर्मिती १६४२९ मेगावॅट होती. १० हजार मेगावॅट पेक्षा जास्त वीजनिर्मितीचा आकडा पुन्हा गाठण्याची महानिर्मितीची तिसरी वेळ आहे. काल ८ मार्च रोजीही महानिर्मितीने १००९७ मेगावॅट निर्मिती केली होती.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कोळसा पुरवठा सुरळीत होण्यासाठी केलेले प्रयत्न आणि महानिर्मितीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या नेतृत्वाखाली महानिर्मितीने राबविलेल्या अनेक सुधारणांमुळे ही विक्रमी वीजनिर्मिती कामगिरी साध्य झाली. त्याबद्दल प्र. संचालक (संचलन) राजू बुरडे, संचालक (मायनिंग) पुरुषोत्तम जाधव, संचालक( वित्त) बाळासाहेब थिटे आणि कार्यकारी संचालक अभय हरणे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. या सामूहिक यशाबद्दल सर्व कर्मचारी, अभियंते, तंत्रज्ञ तसेच अस्थायी कर्मचारी यांचे अभिनंदन केले. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी पूर्ण महानिर्मिती परिवाराचे या अभूतपूर्व कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER