तरुण वयातच कोट्यावधींच्या मालकीण झाल्या या नायिका

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या दक्षिणेतील सुपरस्टार प्रभाससोबत एक अत्यंत भव्य दिव्य आणि बिग बजेट चित्रपट करीत आहे. प्रभास आणि दीपिकाचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनाही एका महत्वाच्या भूमिकेसाठी साईन करण्यात आले आहे. आता हे सगळे सांगण्याचे कारण म्हणजे दीपिकाला या चित्रपटासाठी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 20 कोटी रुपयांचे मानधन देण्यात आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नायिकांमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेण्याचा हा विक्रम आहे आणि तो दीपिकाच्या नावावर झाला आहे.

बॉलिवूडमध्ये अत्यंत लहान वयातच चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात करून 30 वर्षांपर्यंतच कोट्यावधी रुपयांच्या मालकीण झालेल्या नायिका फार कमी आहेत. बॉलिवू़डमध्ये (Bollywood) काम करून या तरुण नायिकांनी मुंबईसह देशात आणि परदेशात आलिशान घरे, महागड्या गाड्या घेतल्या असून पंचतारांकित जीवनमानात राहात आहेत. दीपिका आता फक्त 33 वर्षांचीच आहे तर तिच्याकडे 150 कोटींच्या आसपास संपत्ती असल्याचे सांगितले जात आहे. 21 व्या वर्षी ओम शांती ओम चित्रपटातून काम करून दीपिकाने कारकिर्दीला सुरुवात केली आणि केवळ 12 वर्षात कोट्यावधींची संपत्ती कमवली असून तिची घोडदौड सुरुच आहे.

अत्यंत तरुण वयाचा विचार केला तर या यादीत श्रीदेवीचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षापासून तामिळ चित्रपटात बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. दक्षिणेत सर्व मोठ्या नायकांसोबत काम केलेल्या श्रीदेवीने 1979 मध्ये जेव्हा बॉलिवूडमध्ये सोलहवां सावन चित्रपटातून प्रवेश केला तेव्हा ती फक्त 16 वर्षांची होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये क्रमांक एकच्या पदावर कधी झेप घेतली ते कळलेच नाही. श्रीदेवीने एकूण 200 कोटींच्या आसपास संपत्ती जमवली होती.

श्रीदेवीप्रमाणे तब्बू नेही लहानपणापासूनच म्हणजे वयाच्या नवव्या वर्षी बाल कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. 1980 मध्ये ‘बाजार’ चित्रपटात आणि त्यानंतर 1985 मध्ये देव आनंदच्या ‘हम नौजवान’ मध्ये काम केले होते. तब्बूने खलनायिकेपासून इंस्पेक्टरपर्यंतच्या सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या असून ती यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तब्बूची संपत्तीही 150 कोटींच्या आसपास असल्याचे म्हटले जाते.

माधुरी दीक्षितने वयाच्या 17 व्या वर्षी राजश्रीच्या अबोध चित्रपटातून 1984 मध्ये बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटानंतर माधुरीनेही बॉलिवूडमध्ये प्रवास सुरु करीत श्रीदेवीला टक्कर देत क्रमांक एकच्या पदाला गवसणी घातल. आजही माधुरी छोट्या पडद्यावरील विविध कार्यक्रमात दिसते. माधुरीची एकूण संपत्ती 250 ते 300 कोटींच्या आसपास आहे.

काजोलनेही वयाच्या 18 व्या वर्षी ‘बेखुदी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा चित्रपट चालला नाही. परंतु नंतर काजोलने विविध चित्रपटांमध्ये आपले अभिनय गुण दाखवले आणि ती यशस्वी झाली. शाहरुख आणि तिची जोडी प्रचंड यशस्वी ठरली होती. सध्या काजोल अजय देवगनबरोबर लग्न करून संसारात रमली आहे. दोन मुलांचे संगोपनही ती करीत आहे. असे असले तरी ती अजूनही काही चित्रपटांमध्ये दिसत असते. काजोलनेही 200 कोटी रुपयांची संपत्ती जमा केली आहे.

करिश्मा कपूरनेही वयाच्या 16 व्या वर्षी ‘प्रेम कैदी’ चित्रपटातून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. वयाची विशी गाठेपर्यंत करिश्मा सुपरस्टार झाली होती. गोविंदा आणि तिची जोडी प्रचंड यशस्वी ठरली होती. करिश्माला चित्रपटात घेण्यासाठी निर्मात्यांची रांग लागत असे. करिश्माने उद्योगपती संजय कपूरबरोबर लग्न केले होते. परंतु दोघांचा संसार जास्त काही चालला नाही. घटस्फोट घेऊन करिश्मा स्वतंत्ररित्या जगत आहे. मात्र आजही करिश्मा सोशल मीडिया आणि चित्रपट जगतात अॅक्टिव्ह आहे. करिश्माने 90 च्या दशकातच 50 ते 75 कोटी रुपयांची संपत्ती गोळा केली होती. आज करिश्माची संपत्ती 150 ते 200 कोटी असल्याचे सांगितले जाते.

या यादीत आता प्रख्यात निर्माता दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या मुलीचे आलिया भट्टचेही नाव घ्यावे लागत आहे. आलियाने 1999 मध्ये ‘संघर्ष’ चित्रपटात प्रीति झिंटाच्या लहानपणीची भूमिका साकारून चित्रपटात प्रवेश केला होता. त्यानंतर 2012 मध्ये करण जोहरने तिला ‘स्टूडेंट ऑफ द ईयर’ मध्ये नायिका बनवले तेव्हा ती 19 वर्षांची होती. त्यानंतर आलियाने मागे वळून पाहिलेले नाही. आज आलियाने मुंबईत स्वतःचे आलिशान घर घेतले असून तिच्याकडे महागड्या गाड्याही आहेत. एका अंदाजानुसार आलियाकडे 150 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER