शनिवारी महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक ४,६२,७३५ जणांचं लसीकरण

vaccination in india - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शनिवारी दिवसभरात जवळपास ५० हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी नियम पाळणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग याचे पालन  करणे गरजेचे आहे. याशिवाय सर्वांत  महत्त्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण. राज्यात कोरोना वाढतोय तसा लसीकरणाचाही वेग वाढवण्यात आला आहे. काल दिवसभरात ४ लाख ६२ हजार ७३५ जणांचं विक्रमी लसीकरण करण्यात आलं आहे. काल झालेल्या लसीकरणापैकी ४ लाख ३१ हजार ४५८ लाभार्थ्यांना कोविशिल्ड आणि ३१ हजार २७७ जणांना कोवॅक्सिन लस देण्यात आली. काल एकूण ४,१०२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती.

आतापर्यंत राज्यात एकूण ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात काल एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार ७३५ नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद झाली आहे. याची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांना मागे टाकीत महाराष्ट्राने आतापर्यंत सुमारे ७३ लाख ४७ हजार ४२९ जणांचे लसीकरण करून देशात अग्रभागी राहण्यात सातत्य राखले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्य पहिल्यापासूनच अग्रेसर राहिले आहे.

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून यंत्रणेच्या प्रभावी कामगिरीमुळे आणि नागरिकांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे काल महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची कामगिरी बजावली आहे. अशाच पद्धतीने लसीकरणाला वेग दिल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button