अपयशाची पुनर्बांधणी म्हणजेच यश

Reconstruction of failure is success

आज शैक्षणिक स्पर्धा खूप वाढली आहे .अभ्यासक्रमातील यशाला महत्व आले आहे. पर्यायाने त्या स्पर्धेत धावताना विद्यार्थी जेरीस येतात .बरेचसे विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षांनाही बसलेले असतात. प्रत्येक संधीच्या वेळ काहीतरी हुकते, थोडे मार्क्स कमी पडतात, त्यामुळे निराशा येते .तीच गोष्ट व्यवसायांची, नोकरीची ! अनेक नैसर्गिक आपत्ती, संप, मंदी यासारख्या गोष्टींनी व्यवसाय व नोकऱ्या संकटात येतात . बेकारीची टांगती तलवार नेहमी डोक्यावर असते. आणि त्यातून अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते ,आणि बरेचदा तीव्र निराशा येऊन त्यातून नको ती पावले उचलली जातात.

फ्रेंड्स ! पण हे सगळं केवळ आपण अपयशाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो ,त्यावरून ठरते. खरं तर हेच बघा ! आपल्या शालेय जीवनात, कॉलेजमध्ये निराशेचे ढग ज्यांनी अनुभवले, पण ते निराश तर झालेच नाहीच, त्यांचे आयुष्य नापास झाल्यावर थांबलेही नाही ,उलट त्यांच्यात अविश्वास, अस्वस्थता, मनाची उलघाल होऊनही त्यांनी अपयशाकडे फारच वेगळ्या दृष्टीने बघितले . त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये स्वतःचे असे एक वेगळे स्थान निर्माण केले ,वेगळा ठसा उमटवला. स्वतःचे जीवन समृद्ध केलेच, पण समाजालाही आनंद सौख्य दिले. तुम्हाला आश्चर्य वाटेल आईन्स्टाईन, जे कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल ,लोकमान्य टिळक, शांता शेळके, दया पवार ,राजकपूर, गुलजार ,सुशील कुमार शिंदे यांच्यासारखे काही तत्त्वज्ञ, राजकारणी ,चित्रकार, कलावंत, लेखक यांनी अनेक वेळा अपयश अनुभवले. त्यांनाही अस्वस्थता जाणवली पण तिथे रुतून न बसता अपयशाला त्यांनी यशात परावर्तित केले. काय असेल त्यांचे कारण? कसा असेल त्यांचा दृष्टीकोन?

अपयशाची पुनर्बांधणी करून यशाकडे जाणारा मार्ग त्यांनी कसा मोकळा केला असेल ?
यश हा जादुई शब्द आहे. सगळ्यांना हवाहवासा पण तितकाच अपयश हा नाकारलेल्या शब्द ! आपण विद्यार्थी असो की उद्योगपती, नोकरी करीत असो की व्यवसाय ,स्वतःच्या क्षेत्रात यशस्वी नव्हे अलौकिक यश मिळवायची सगळ्यांचीच इच्छा असते .गृहिणी सुद्धा तिच्या क्षेत्रांमध्ये सुपरवुमन बनू पाहते. पण जीवनाचा रस्ता हा अगदी राजमार्ग कधीच नसतो. आणि असं म्हणतात, “The room at the top is narrow and we all want to be at the top .”अगदी खरे आहे. यश म्हटले की अपयश आलंच .सगळ्या वेळी सगळेजण यशाच्या शिखरावर कसे पोहोचणार ? तुम्ही म्हणाल की यश मिळणार ही आपल्या आयुष्या कडून केलेली खरं तर अतिशय माफक अपेक्षा आहे. पण तरीही प्रत्येकाने कुठेतरी थांबून सिंहावलोकन करायचं असतं. थोडा ठहेराव हा या प्रवासात गरजेचा असतो.

आपण जेव्हा अपयशी होतो तेव्हा त्याला जबाबदार कोणत्या गोष्टी होतात?
* स्व आदराचा अभाव: काही जणांचा समज असतो की अपयश हे कायमस्वरूपी आणि सुधारणा न करता येणारे आहे. त्यांची मानसिकताच अपयशाला खूप भाव देणारी ,गोंजरणारी असू शकते. तुम्ही तुमच्या मागील चुकांबाबत दुःखी असाल किंवा स्वतःच्या मनाशी किंवा इतरांबरोबरच्या संभाषणात अपयशावरून आपली किंमत ठरवत असाल ,तर एक गोष्ट नक्की की आपला स्व आदर कुठेतरी कमी पडतोय. तुमचा स्वतःचा स्वतःवर विश्वास नसेल .तुमचे ध्येय तुम्ही मिळवु शकता ही खात्री मनाशी नसेल, तर या भूतलावरची कुठलीही शक्ती तुमच्यासाठी काहीच करू शकणार नाही.

वास्तव परिस्थिती ही असते की आपल्यापैकी प्रत्येकच व्यक्ती चांगली आणि समर्थच आहे ! म्हणून विपरीत परिस्थितीत नव्या कामाला सुरुवात करताना सर्वप्रथम स्वतःला blame करणे ,कमी लेखणे सोडून द्या, स्वतःला” बिचारा “बनवण्यापासून परावृत्त व्हा. कारण स्वतःला शोषित समजणारी कुठलीही व्यक्ती कमजोर असते

* अपयशाचा स्वीकारच न करता येणे : अपयश ही यशाची पहिली पायरी वगैरे आपण नेहमी म्हणतो पण या पायरीवरून काही बोध आपण घेत नाही. अपयशाला स्वीकारत नाही, एक्सेप्ट च करत नाही.

“Failure is the part and Parcle of the game .” असा स्वीकार केला तरच पुढची वाटचाल सुकर होते. अडथळे, अडचणी सगळ्यांच्याच आयुष्यात असतात .म्हणूनच मनाची तयारी अशी करायची की अपयश हे अतिशय सामान्य आहे. त्या पासून कुणाची सुटका झालेली नाही आणि म्हणूनच त्याचा ग्रेसफुली स्वीकार करून त्याचे यशात रूपांतर करता येते. उदा. एखादा प्रश्न किंवा समस्या . जेव्हा आपल्याला नेमका प्रश्न पडतो आणि त्यामागची कारणं कुठली हे जेव्हा समजतं त्यावेळी आपण तो प्रश्न हमखास सोडवू शकतो. त्याच प्रमाणे अपयशामागचं कारण समजलं तर त्यातून बाहेर येऊ शकतो .त्यासाठी अपयश स्वीकारणे सगळ्यात गरजेचे आहे.

*इच्छाशक्तीचा अभाव : इच्छाशक्तीही प्रत्येक माणसामध्ये असते .फरक एवढाच की काहींच्या बाबतीत ती निद्रीस्त असते. जेव्हा आपण कोणताही टास्क ठरवतो तेव्हा हीच शक्ती आपल्याला त्या ध्येयाच्या वाटेत येणाऱ्या अडचणीशी सामना करण्याची शक्ती देते. उदाहरणार्थ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा या पदापर्यंत पोचण्याचा प्रवास खडतर होता .कारण तिथे वर्णभेद होता. इतक्या मोठ्या देशाची विचारसरणी बदलणे म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने केलेला प्रवास होता. त्यात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले ,पण त्यांची इच्छाशक्ती इतकी तीव्र होती की शेवटी अमेरिकन नागरिकांनी त्यांना राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर विराजमान केले.

आषाढी एकादशी जवळ आली की भक्त यात्रेसाठी निघतात, विशेषतःसगळे वारकरी संप्रदायाचे लोक. वाटेत कितीही अडचणी आल्या तरी कष्ट घ्यावे लागले तरी त्यांच्या स्वतःकडे त्यांचं काहीही लक्ष नसतं त्यांच्या नजरेसमोर असतो ,तो फक्त विठ्ठल पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास ! तो ध्यास म्हणजेच इच्छाशक्ती.

असे अनेक विद्यार्थी मी बघितले आहेत की जे स्पर्धा परीक्षांसाठी प्रयत्न करतात आणि अपयशी होतात .पण ते प्रयत्न मात्र चालूच ठेवतात आणि सगळ्यात शेवटी ,शेवटची संधी असते तेव्हा चक्क यशस्वी होतात. त्यांच्यापैकी काही मुलांशी जेव्हा मी बोलले, त्यावेळी ते म्हणतात की जेवण झोप आणि व्यायाम याव्यतिरिक्त सगळा वेळ हा अभ्यासासाठी दिलेला होता .खरतर त्यांना पिक्चर बघणे म्युझिक आणि बरच काही गोष्टींची आवड होती .पण ते सगळं बाजूला ठेवून तयारीसाठी एक वर्ष त्यांनी स्वतःला दिले. आणि त्यात ते खुश होते आणि मुख्य म्हणजे यशस्वीही झाले. त्यांनी त्यांच्या अपयशाची पुनर्बांधणी केली ती स्वतःवरच्या विश्वासाने आणि मुख्य म्हणजे चिकाटीतून !

*प्रेरणाशक्ती , चिकाटी, आणि योग्य पर्याय निवडीचा अभाव: माणसाला इच्छा आहे. उत्सुकता आहे. देवाची पण उत्तम साथ आहे. परंतु काम करण्याची तयारी नाही .आहे तसे राहण्यातच तो खुश आहे असं असेल तर सगळं संपलं. काही हाती लागणार नाही. त्याचप्रमाणे बरेचदा परिस्थितीच योग्य लागते असे नाही, तर आपण आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी निवडतो ती निवडही योग्य असावी लागते. याशिवाय आपली स्वतःची प्रेरणा शक्ती ,आंतरिक शक्ती ही आपल्या यशाचे पेट्रोल आहे म्हटलं तरी वावगे ठरणार नाही. पण याचा अभाव असणारे लोक, काही करण्याची इच्छाच नसणारे लोक यशाचा संबंध’ लक ‘ luck शी जोडतात, पण काहीतरी मिळवायचं तर काहीतरी गमावण्याची त्यांची तयारी नसते.

“गो गेटर वृत्ती “म्हणजे स्वतःला कार्यसिद्धीसाठी झोकून देणे ! ती अपयशातून यशाकडे नेते. यशासाठी ची जबरदस्त म्हणा तहान किंवा व्याकूळता. ही वृत्ती स्वीकारतांना जो दिवस आपण आपल्या स्वतःच्या उन्नतीकरिता वापरत नाही, तो दिवस आपल्या जीवनात गमावलेला दिवस असतो असं म्हणून जर कृतीला सुरुवात केली तर अपयशाला रामराम ठोकता येतो.

इसापनीती मधली एक छान गोष्ट आहे. सकाळच्या वेळी एका जंगलात एक चित्ता रपेट मारत असतो. त्यावेळी त्याला एक ससा दिसतो. सशाचा बिळ असतो जंगलाच्या दुसर्‍या टोकाला. त्याला पाहून चित्त्याच्या तोंडाला पाणी सुटतं. त्याला वाटतं नाश्त्याची सोय झाली ,तो त्याच्या मागे लागतो. कशाला लक्षात येताच तो जीव मुठीत धरून बेभानपणे पळत सुटतो. जंगलातला सगळ्यात वेगवान प्राणी सशाच्या मागे ! विचार करा. तरीही ससा बिळात पोहोचतो. चित्यालाही आश्चर्य वाटतं ,तो सशाला विचारतो. त्यावेळेस ससा म्हणतो की तू फक्त तुझ्या नाश्त्यासाठी धावत होता ,पण मी माझ्या कधीही परत न मिळणाऱ्या जिवासाठी धावत होतो. हीच ती गो गेटर वृत्ती !

*आत्मविश्वास आणि फोकस चा अभाव : यशस्वीतेचे महत्त्वाचे सूत्र म्हणजे आत्मविश्वास आणि तो केव्हा येतो ? तो येतो तयारी हार्ड वर्क आणि एका task वरदृष्टी केंद्रित करणे यामधून ! उदाहरणार्थ आता माझा हा आर्टिकल लिहिताना बरेच वेळा फोन वाजतात, पण माझी प्राथमिकता माझ्या कामाला आहे. इतर लोक त्यांच्या सोयीने फोन करतात .मग मीही माझ्या सवडीच्या वेळी फावल्या वेळातच् फोन करायला हवेत.

*अपयश म्हणजे जगाचा अंत नव्हे ! स्वामी विवेकानंद म्हणतात,”अपयशाकडे मुळीच लक्ष देऊ नका. अपयशाखेरीज जीवन ते काय? या अपयशावर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर ते तसले अळणी जिणे जगण्यात काय स्वारस्य ? म्हणून अपयशांची खंत बाळगू नका. क्षूल्लक पीछेहाटीबद्दल खेद करू नका. हजार वेळा आपल्या आदर्शला धरून राहण्याचा प्रयत्न करा. आणि हजारही वेळा अपयशी झालात ,तरी फिरून एकवार कंबर बांधून प्रयत्न करा.”
फ्रेंड्स ! तर मग अपयश आले तरी सज्ज राहा अपयशाची पुनर्बांधणी करायला. आणि यशस्वी व्हा!

मानसी गिरीश फडके
(समुपदेशक व सायकोथेरपिस्ट)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER