९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीच्या जन्मठेपेवर पुनर्विचार

गुन्हा करताना बालगुन्हेगार असल्याची नवी याचिका

९३च्या बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपीच्या जन्मठेपीवर पुुनर्विचार

नवी दिल्ली :- दि.१२ मार्च, १९९३ रोजी मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांशी संबंधित खटल्यात जन्मठेप झालेल्या मुहम्मद मोईन फरिदुल्ला कुरेशी या सिद्धदोष गुन्हेगाराने त्या निकालाच्या फेरविचारासाठी केलेली याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) तयार झाले. कुरेशीला ठोठावलेली ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने  २१ मार्च, २०१३ रोजी कायम केली होती. त्यानंतर केलेली फेरविचार याचिकाही फेटाळली गेली होती.

आता कुरेशीने संविधानाच्या अनुच्छेद ३२ चा आधार घेत नवी रिट याचिका केली आहे. ज्यासाठी ही शिक्षा दिली गेली तो गुन्हा केला तेव्हा आपण १७ वर्षे ३ महिन्यांचे म्हणजेच अल्पवयीन होतो. त्यामुळे बालगुन्हेगार कायद्यानुसार या शिक्षेचा फेरविचार करावा, अशी त्याची विनंती आहे.

ही याचिका न्या. डॉ. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे आली. कुरेशीचे ज्येष्ठ वकील एस. नागामुथू यांना न्या. चंद्रचूड म्हणाले, तुमच्या अशिलाच्या बाबतीत बालगुन्हेगारीचा मुद्दा यापूर्वीच विचारात घेण्यात आला होता व तो अंतिमत: निकाली काढला गेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला फेरविचार याचिका किंवा ‘क्युरेटिव्ह पिटिशन’ करणे एवढाच मार्ग शिल्लक आहे. तुम्ही अनुच्छेद ३२ अन्वये रिट याचिका करू शकत नाही.

या संदर्भात न्या. चंद्रचूड यांनी सन २०१६ मधील एका निकालाचा हवाला दिला. त्या निकालाने एका आरोपीची ‘टाडा’ कायद्यान्वये सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायम केली गेलेली जन्मठेप नंतर उपस्थित केलेल्या बालगुन्हेगारीच्या मुद्द्यावर रद्द केली होती. न्या. चंद्रचूड नागामुथू यांना म्हणाले की, त्या निकालपत्रात असा फेरविचार करण्यासाठी जे वर्गीकरण ठरविले  होते त्यात तुमचा अशील बसत नाही.

परंतु नागामुथू यांनी आणखी दोन निकालपत्रांचा हवाला देत विनंती केली की, मला फक्त एक संधी द्या. माझा अशीलही बालगुन्हेगारी कायद्याचा फायदा मिळण्यास कसा पात्र आहे ते मी तुम्हाला पटवून देईन. मात्र त्यासाठी कृपया सुनावणी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे घेतली जावी.

शेवटी न्यायालयाने ही विनंती मान्य केली व पुढील आठवड्यात तीन न्यायाधीशांचे खंडपीठ कुरेशीच्या या नव्या याचिकेवर विचार करेल, असे ठरले.

कुरेशीचे सिद्ध झालेले गुन्हे

ज्या सिद्ध झालेल्या गुन्ह्यांसाठी कुरेशीला ही जन्मठेप झाली आहे ते असे :

  • बाबरी मशीद पाडल्याबद्दल हिंदूंचा सूड घेण्याची शपथ घेतली.
  • रायगड जिल्ह्यात शेंदरी व बोरघाट येथे शस्त्रे चालविण्याचे व स्फोटके हाताळण्याचे प्रशिक्षण घेतले.
  • बॉम्बस्फोट करण्याचे कारस्थान आखण्याच्या बैठकीत सहभाग.
  • ११ व १२ मार्च, १९९३ दरम्यानच्या रात्री याकुब मेमन याच्या वाद्रे येथील ‘अल हुसैनी’ इमारतीच्या बेसमेंटमध्ये स्फोटांसाठी वापरायच्या मोटारींमध्ये ‘आरडीएक्स’ भरले.
  • इतर सहआरोपींसोबत माहीम कोळीवाड्यात हातबॉम्ब फेकले.
  • घातपातासाठी वापरायचे १७ हातबॉम्ब इमारतीच्या पाण्याच्या टाकीत दडवून ठेवले.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER