
नवी दिल्ली :- सरन्यायाधीश शरद बोबडे येत्या २३ एप्रिल रोजी सेवानिवृत्त होण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या अध्यक्षतेखालील ‘कॉलेजियम’कडून सर्वोच्च न्यायालयावरील नव्या न्यायाधीशांच्या नेमणुकांसाठी नावांची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची ३४ पदे मंजूर असून काही दिवसांपूर्वी न्या. इंदू मल्होत्रा यांच्या निवृत्तीने आता तेथे पाच पदे रिक्त आहेत. माहीतगार सूत्रांनुसार या रिक्त पदांवर नेमणुकांसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर विचार करण्यासाठी ‘कॉलेजियम’ची बुधवारी बैठक झाली. ‘कॉलेजियम’मध्ये सरन्यायाधीश बोबडे यांच्याखेरीज न्या. एन. व्ही. रमणा, न्या. रोहिंग्टन नरिमन, न्या. उदय लळित व न्या. अजय खानविलकर यांचा समावेश आहे.
सूत्रांनुसार बुधवारच्या बैठकीत तीन उच्च न्यायालयांचे मुख्य न्यायाधीश व दोन महिला न्यायाधीश यांच्या नावांवर विचार करण्यात आला. परंतु कोणताही निर्णय झाला नाही.
सूत्रांनुसार ‘कॉलेजियम’ची पुढील बैठक बहुधा सरन्यायाधीश बोबडे यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी होईल त्यात काही निर्णय झाला तर न्या. बोबडे यांच्या सरन्यायाधीशपदाच्या कारकीर्दीत सर्वोच्च न्यायालयावरील नेमणुकीसाठी ती पहिलीच सिफारस असेल. १८ नोव्हेंबर, २०१९ रोजी सरन्यायाधीश झाल्यापासून न्या. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील ‘कॉलेजियम’ने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी एकही नाव सुचविलेले नाही.
ही बातमी पण वाचा : सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या भत्त्यात वाढ
अजित गोगटे
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला