पवारांच्या इशाऱ्याचं गांभीर्य ओळखा; संजय राऊतांचा केंद्राला सल्लावजा इशारा

Sanjay Raut & Sharad Pawar

नाशिक :- शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिक येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर आगपाखड केली. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत गंभीर नाही. भविष्यात आणखी लाखो शेतकरी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर येतील ही बाब स्पष्ट केली. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शेतकरी हिंसक होतील असा इशारा दिला आहे. त्यामुळं आता केंद्र ते हिंसक होण्याची वाट पाहात आहे का? केंद्र सरकारने पवारांच्या इशाऱ्याला गांभीर्याने घ्यावे, असं म्हणत शेतकरी हिंसक झाले तर सरकार जबाबदार असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

यावेळी राऊत म्हणाले की, राज्यपाल नियुक्ती आमदारांना उशीर होत आहे. राज्यपालांकडे दोन वेळा प्रस्ताव पाठविण्यात आला. पहिल्या प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगण्यात आल्यानंतर आघाडी सरकारकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीनुसार दुसरा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यात १२ राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे आहेत. राज्यपाल स्वतःला घटनाप्रमुख समजत असतील तर त्यांनी न्यायालयात जायला लावू नये. राज्यपाल एका पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहेत. घटनेची बूज  राखायची असेल तर राज्यपालांना परत बोलवावे, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले.

यावेळी त्यांनी एल्गार परिषदेवरही टीकास्त्र सोडलं. एल्गारवाल्यांची मानसिकता तपासण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यामुळे राज्यात वातावरण बिघडत आहे. यापुढे त्यांना परवानगी देण्याबद्दल विचार करावा लागेल, असेही ते यावेळी म्हणाले. एल्गार परिषदेत भडकावू भाषण करणारा शरजील उस्मानी ही घाण उत्तरप्रदेशातून आली असून योगी सरकारने आमच्या पोलिसांना सहकार्य करावं, असंही त्यांनी आवाहन केलं आहे.

ही बातमी पण वाचा : नाना पटोलेचा राजीनामा : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नाराज; संजय राऊतांचा दुजोरा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER