‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून पाचगणीला मान्यता

Pachgani

सातारा : जागतिक दर्जाचे थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पाचगणीला आतापर्यंत पर्यटनस्थळांच्या वर्गवारीत स्थान मिळाले नव्हते; पण नुकतीच राज्य शासनाने ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून पाचगणीला (Pachgani) मान्यता दिली. ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने पाचगणीच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. ब्रिटिशांनी निर्माण केलेले थंड हवेचे ठिकाण म्हणून पाचगणीची ओळख आहे. इंग्रजांच्या आगमनाने इथला चेहरामोहराच बदलून गेला होता. विविध पॉइंटची नावे पाहिल्यानंतर इंग्रजी अधिकाऱ्यांची आठवण होते. इंग्रज अधिकाऱ्यांच्या महाबळेश्वर प्रेमापोटी इथली बाजारपेठ वसवली गेली. त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीदेखील पाचगणीवर प्रचंड प्रेम केले होते. पाचगणी शहराला पर्यटनस्थळ वर्गवारीमध्ये आजपर्यंत कधीच स्थान मिळाले नव्हते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे फेब्रुवारी महिन्यात कुटुंबासमवेत महाबळेश्वर येथे खासगी दौऱ्यानिमित्त आले होते. त्यांनी पाचगणीच्या पर्यटनस्थळात स्थान देण्याचे आश्वासन दिले होते.

पाचगणी गिरिस्थान हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ समुद्रसपाटीपासून सुमारे ४ हजार ३०८ फूट उंचावर आहे. या ठिकाणी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचावरील १०० एकरवर टेबललँड हे पठार आहे. टेबललँडजवळ कोरीव लेण्या आहेत. पाचगणी परिसरात कृष्णा, वेण्णा नदीचे खोरे, धरण परिसर आणि निसर्गसौंदर्य दिसणारे पारशी पॉइंट, सिडने पॉइंट, स्वच्छ भारत पॉइंट, हरिसन फॉली इत्यादी ठिकाणे आहेत. या शहराचे तापमान प्रखर उन्हाळ्यामध्येसुद्धा २५ से ३० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नसते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER